अभियानापासून सर्वसामान्य अद्याप दूरच !
By Admin | Updated: December 19, 2014 00:56 IST2014-12-19T00:47:26+5:302014-12-19T00:56:37+5:30
उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत येणाऱ्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे.

अभियानापासून सर्वसामान्य अद्याप दूरच !
उस्मानाबाद : ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत येणाऱ्या पाच वर्षांमध्ये संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. हे अभियान सुरू होऊन सुमारे अडीच महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरीही शहरातील नागरीक या अभियानापासून अद्यापही कोसोदूर असल्याचे ‘लोकमत’च्या सर्वेक्षणातून पुढे आले. प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविल्यानंतरही शहरातील तब्बल ८४ टक्के लोकांनी अद्यापही या अभियानात सहभाग घेतलेला नाही.
केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार देशातील शहरी भागात प्रत्येक वर्षी ४७ मिलियन टन कचरा निर्माण होतो. यामुळे शहर तर विद्रूप होतेच, याबरोबरच तेथील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातही अनेक गंभीर तक्रारी निर्माण होतात. हे सर्व टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान देशभरात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असून, शाळा महाविद्यालयामध्येही याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही उस्मानाबाद शहरातील मोठा वर्ग अद्यापही या अभियानापासून दूर असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. या अभियानाअंतर्गत आपण स्वच्छतेसाठी सक्रिय सहभाग घेतला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर केवळ १६ टक्के नागरिकांनी सहभाग नोंदविल्याचे सांगितले असून, ८४ टक्के नागरिकांनी मात्र आपण अद्यापही या अभियानापासून दूर असल्याची कबुली दिली आहे.
अभियानाच्या जनजागृतीसाठी शासनाने विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. या बरोबरच प्रसार माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. प्रियंका चोप्रा, सचिन तेंडूलकर यांच्यासह विविध मान्यवर या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जाहिरातीच्या माध्यमातून करीत आहेत. त्यामुळेच या अभियानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याचे सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिसून आले. या अभियानाबाबत आपणाला माहिती आहे का? नागरिकांना विचारण्यात आला होता. यावर ८६ टक्के नागरिकांनी होय हे अभियान आम्हाला माहिती आहे, असे नमूद केले असून, १४ टक्के नागरिक मात्र अद्यापही या अभियानापासून अनभिज्ञ असल्याचे सर्वेक्षणावेळी दिसून आले.
प्रत्येकाकडून कचरा निर्माण होत असतो. मात्र आपल्यामुळे निर्माण झालेला कचरा दुसऱ्या कोणी तरी उचलावा, अशी मानसिकता नागरिकांची असते. यामध्ये बदल होत असला तरी, आपल्या परिसरातील कचरा आपणच उचलावा, आणि आपणच आपले आरोग्य राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही मानसिकता रुजविण्याची आवश्यकता असल्याचे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून दिसून आले. आपल्या परिसराची स्वच्छता प्रामुख्याने कोण करतो? या प्रश्नावर ५८ टक्के नागरिकांनी आम्ही स्वत:च तो उचलतो, असे स्पष्ट केले आहे. मात्र ४२ टक्के नागरिक मात्र पालिका व इतरांवर अवलंबून असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. ४
शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. वर्ग, प्रयोग शाळेबरोबरच शाळेतील वाचनालयाचीही स्वच्छता विद्यार्थ्यांनी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने करावी. यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. याचे सकारात्मक परिणाम होत असल्याचे हे सर्वेक्षण सांगते. या अभियानामुळे कोणत्या वर्गात स्वच्छतेबाबत जागरुकता निर्माण झाली? असा प्रश्न विचारला असता सर्वाधिक म्हणजे ४२ टक्के नागरिकांनी शालेय विद्यार्थ्यांचे नाव घेतले. ३८ टक्के नागरिकांनी या अभियानामुळे महिलावर्गामध्ये मोठी जागरुकता निर्माण झाली, असे वाटते तर २० टक्के नागरिक या अभियानामुळे पुरुषवर्गही स्वच्छतेकडे वळल्याचे सांगतो. ४
२ आॅक्टोबर २०१४ पासून देशभरात सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान २ आॅक्टोबर २०१९ रोजी संपणार आहे. या पाच वर्षांत या योजनेसाठी १ लाख ९६ हजार ९ कोटी रुपये खर्चाचे नियोजन असून, या योजनेमध्ये शहर विकास मंत्रालय, ग्रामीण विकास मंत्रालय, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय, राज्य शासन, सार्वजनिक क्षेत्रातील विविध संस्था उपक्रम आदींचा सहभाग आहे. या अभियानाअंतर्गत पाच वर्र्षामध्ये संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा निर्धार करण्यात आला असून, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारणे, याबरोबरच स्वच्छ पाणी पुरवठा करणे तसेच विविध वस्त्यांबरोबरच रस्ते, फुटपाथ आदी स्वच्छ ठेवण्यात येणार आहे.
कचरा विलगीकरणाकडे कानाडोळा
४सुक्या कचऱ्यामध्ये काच, चामड्यांच्या वस्तू, कागद, प्लॅस्टीक, थर्माकोल, लाकूड सामानासह इतर वस्तू येतात. तर फळे, खाद्यपदार्थ, भाजीपाला, अंडी तसेच टाकाऊ पदार्थ या बाबीला ओला कचरा असे म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा घंटागाडीमध्ये टाकण्यापूर्वी या कचऱ्याचे ओला आणि सुका असे विलगीकरण करण्याची आवश्यकता असते. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे या सर्वेक्षणातून दिसून आले. केवळ २७ टक्के नागरिकांनी घरातील कचऱ्याचे आम्ही विलगीकरण करतो, असे सांगितले असून, ६ टक्के नागरिकांनी कधी-कधी विलगीकरण केले जाते, असे म्हटले आहे. तर शहरातील ६७ टक्के नागरिकांनी कचरा विलगीकरणाकडे कानाडोळा होतो, याची कबुली दिली.