जागतिक स्पर्धेसाठी गौरव, ऋग्वेद, शर्वरी भारतीय संघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 18:40 IST2018-05-27T18:36:41+5:302018-05-27T18:40:09+5:30
पोर्तुगाल येथील गुमरेज येथे ३0 मे ते ३ जूनदरम्यान होणाऱ्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादच्या गौरव जोगदंड, ऋग्वेद जोशी व शर्वरी लिमये यांची भारतीय संघात निवड झाली आहे. डॉ. मकरंद जोशी यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे .भारतीय संघ निवडण्यासाठी १५ एप्रिल रोजी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात निवड चाचणी स्पर्धा झाली होती.

जागतिक स्पर्धेसाठी गौरव, ऋग्वेद, शर्वरी भारतीय संघात
औरंगाबाद : पोर्तुगाल येथील गुमरेज येथे ३0 मे ते ३ जूनदरम्यान होणाऱ्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादच्या गौरव जोगदंड, ऋग्वेद जोशी व शर्वरी लिमये यांची भारतीय संघात निवड झाली आहे. डॉ. मकरंद जोशी यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे .
भारतीय संघ निवडण्यासाठी १५ एप्रिल रोजी ‘साई’च्या पश्चिम विभागीय केंद्रात निवड चाचणी स्पर्धा झाली होती. या निवड चाचणीत महाराष्ट्र, सेना दल व गुजरात या राज्याच्या संघांनी सहभाग घेतला. या चाचणीतून गौरव जोगदंड पुरुष एकेरी (महाराष्ट्र) ऋग्वेद जोशी व शर्वरी लिमये मिश्र दुहेरी (महाराष्ट्र) यांचीच भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या भारतीय संघाचे शिबीर साई केंद्रातच झाले. खेळाडूंना डॉ. मकरंद जोशी, आदित्य जोशी, सागर कुलकर्णी, सिद्धार्थ कदम यांचे मार्गदर्शन मिळाले.
निवड झालेला गौरव जोगदंड याची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून याआधी त्याने २०१२ ला कनिष्ठ गटात बल्गेरियातील सोफिया येथे झालेल्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच चार राष्ट्रीय स्पर्धेत त्याने सुवर्ण व रौप्य पदक विजेती कामगिरी केलेली आहे. गत वर्षी बंगळुरू येथील राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य जिंकले होते. गौरव जोगदंड हा सध्या महाराष्ट्र पोलीस खात्यात कार्यरत आहे. ऋग्वेद जोशी याची ही तिसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा असून २०१२ सोफिया, २०१६ इंचोन दक्षिण कोरिया येथे कनिष्ठ गटात ऋग्वेदने भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. त्याने पाच राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य विजेती कामगिरी त्यांनी केलेली आहे. गत वर्षी बंगळुरूयेथील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते. यंदा त्याची पहिलीच वरिष्ठ गटातील स्पर्धा आहे. ऋग्वेद जोशी हा देवगिरी महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत आहे. शर्वरी लिमये हिने हि २०१४ साली जकार्ता इंडोनेशिया येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तिची ही दुसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. गत वर्षी बंगळुरु येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने सुवर्ण पदक जिंकले होते. शर्वरी लिमये देवगिरी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झालेले डॉ. मकरंद जोशी यांनी नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचे प्रशिक्षक व व्यवस्थापकपद भूषवले होते. त्यांनी आतापर्यंत दोन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, मेक्सिको व एक एशियन चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी केलेली आहे तसेच त्यांना पाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धा, दोन इंडोर एशियन गेम्स व दोन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पंच म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेसाठी खेळाडू प्रशिक्षकांना भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघाचे अध्यक्ष श्री सुधाकर शेट्टी, सचिव रणजित वसावा, उपाध्यक्ष कौशिक बिडीवाला, रियाज भाटी, महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटनेचे अध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष उत्तम लटपटे, पवन भोईर तसेच साईचे क्रीडा उपसंचालक वीरेंद्र भांडारकर, वरिष्ठ प्रशिक्षक अजितसिंग राठोड, रामकृष्ण लोखंडे, प्रशिक्षक तनुजा गाढवे, संकर्षण जोशी, प्रा. सागर कुलकर्णी आदींनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.