गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:54 IST2017-08-22T23:54:37+5:302017-08-22T23:54:37+5:30
तालुक्यातील घोळवा येथे २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

गॅस सिलिंडरचा स्फोट; एक जण जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्यातील घोळवा येथे २२ आॅगस्ट रोजी संध्याकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. तर यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
घोळवा येथील प्रसाद किशनराव पोले (३५) यांनी संध्याकाळी ४.३० वाजेच्या दरम्यान राहत्या घरी गॅस सुरू करून त्यावर चहा केला. चहा घेतल्यानंतर ते बिछान्यावर पडले. यादरम्यान मात्र गॅस लिकेज झाला होता. त्यामुळे अचानक स्फोट झाला. टाकी मात्र तरीही शाबूत असल्याने लिकेजचा अंदाज व्यक्त होत आहे. या स्फोटामुळे घरात आग लागली. यात टीव्ही, कूलर, अलमारीतील साहित्य, पलंग, गादी व इतरही साहित्य जळाले. तसेच घरावरील टीनपत्रे उडाली व त्यांचेही नुकसान झाले. प्रसाद पोलेही चांगलेच भाजल्या गेले. या स्फोटाच्या आवाजाने गावातील डिगांबर मस्के, गजानन कदम, बालासाहेब मस्के, संतोष पोले, कैलास भीसे, अनिल कापसे आदी जमा झाले. या सर्वांनी घरात प्रवेश करून आग विझविली व प्रसाद पोले यांना कळमनुरीच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. येथे प्राथमिक उपचार करून जखमीला नांदेड येथे हलविण्यात आले.
जखमीवर डॉ. आनंद मेने यांनी उपचार केले. पोले हे ५५ टक्के भाजले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. मेने यांनी दिली.
घरी एकटेच होते
जखमी प्रसाद पोले यांच्या घरची सर्व मंडळी शेतात गेली होती. ते एकटेच घरी होते. त्यामुळे प्रसाद यांना एकट्यालाच यात दुखापत झाली.