उद्याने, जलतरण तलाव कधी होणार चालू?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:05 IST2021-09-23T04:05:11+5:302021-09-23T04:05:11+5:30
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी अद्याप शहरातील उद्याने, जलतरण तलाव बंदच आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून दैनंदिन ...

उद्याने, जलतरण तलाव कधी होणार चालू?
औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी अद्याप शहरातील उद्याने, जलतरण तलाव बंदच आहेत. शहरात मागील काही दिवसांपासून दैनंदिन व्यवहार पूर्ववत झाले. कोरोनाचे रुग्ण दररोज बोटावर मोजण्याएवढेच सापडत आहेत. त्यानंतरही शासनाने उद्याने, जलतरण तलाव बंद ठेवले आहेत. मनपा प्रशासन शासनाच्या पुढील आदेशाची वाट पाहत आहे.
शहरातील सर्वात मोठे आणि बाराही महिने गजबजलेले उद्यान म्हणजे सिद्धार्थ होय. मार्च १०१९पासून हे उद्यान बच्चे कंपनीसाठी बंद आहे. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शासन निर्देशानुसार मनपाने उद्यान बच्चे कंपनीसाठी खुले केले होते. मात्र, अवघ्या आठ ते दहा दिवसातच उद्यान पुन्हा बंद करण्यात आले. दुसरी लाट आली आणि गेली तरी शासनाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. प्राणी संग्रहालयसुद्धा दोन वर्षांपासून बंदच आहे. याठिकाणी नवीन पर्यटक आल्यास प्राण्यांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानेही मनपाला प्राणी संग्रहालय सुरू करण्यासंदर्भात सूचना दिलेली नाही. शहरातील इतर सर्व उद्यानांना महापालिकेने कुलूप लावून ठेवले आहे. सिद्धार्थ उद्यान सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यात येते. सकाळी व्यायाम, प्राणायाम करण्यासाठी अनेक ज्येष्ठ नागरिक याठिकाणी येतात. दरम्यान, महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले की, राज्यातील सर्वच उद्याने बंद आहेत. मुंबई महापालिकेने अलीकडे एक उद्यान सुरू केले होते. दोन ते तीन दिवसानंतर त्यांनाही ते बंद करावे लागले. शासनाकडून आदेश आल्यानंतर बच्चे कंपनीसाठी उद्यान सुरू करण्यात येईल. सध्या उद्यान बंद असल्याने महापालिकेचा महसूलही बुडत आहे.