उद्याने बनली टवाळखोरांचे अड्डे...!
By Admin | Updated: May 14, 2014 01:06 IST2014-05-14T00:58:54+5:302014-05-14T01:06:18+5:30
उदगीर : उदगीर शहरात व बनशेळकी तलावाच्या खाली असलेल्या पालिकेच्या मालकीची असलेल्या सर्व उद्यानाची दुरावस्था झाली.

उद्याने बनली टवाळखोरांचे अड्डे...!
उदगीर : उदगीर शहरात व बनशेळकी तलावाच्या खाली असलेल्या पालिकेच्या मालकीची असलेल्या सर्व उद्यानाची दुरावस्था झाली असून ही उद्याने आज घडीला टवाळखोरांची अड्डे बनली आहेत. पालिकेने या सर्व उद्यानाच्या ठिकाणी सुरक्षा गार्डची नेमणूक करून ही उद्याने सुरक्षित वातावरणात सुरू करून बाल-गोपाळांसह सर्वांना लाभ मिळवून देण्याची मागणी उदगीर शहरवासियांनी केली आहे. उदगीर शहरात नगरपरिषदेच्या मालकीची महात्मा गांधी, हुतात्मा स्मारक, अहिल्यादेवी होळकर उद्याने आहेत. याशिवाय बनशंकरी तलावाखाली पालिकेने लाखो रुपये खर्चून उद्यान व सहल केंद्र तयार केले आहे. यासाठी राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिळालेला निधीही खर्च करण्यात आला. याठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी मोठी बैठक व्यवस्था करण्यात आली. शिवाय लहान बाल-गोपाळांना खेळण्यासाठी मोठ्या प्रमाणात खेळणीचे साहित्य लावण्यात आले आहे. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून या ठिकाणी असलेल्या उद्यान व सहल केंद्राकडे पालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे या उद्यानात आता मोठ-मोठी काटेरी कुंपणाची झाडे-झुडूपे व गवत वाढलेले आहे. शेळ्या-मेंढ्या व जनावरे चारण्यासाठी या उद्यानाचा उपयोग होत आहे. पालिकेच सुरक्षा गार्ड या ठिकाणी नसल्यामुळे टवाळखोरांचा अड्डा या ठिकाणी बनला आहे. उदगीर शहराच्या मध्यवस्तीत म. गांधी व हुतात्मा स्मारकाचे उद्यान आहे. या उद्यानासाठी पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे आजूबाजूने लावण्यात आलेले झाड वाळून जात आहे. म. गांधी उद्यानाभोवती बार-रेस्टॉरंटची हॉटेल्स व अन्य व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या ठिकाणी डासांचा मोठा प्रादुर्भाव असून दुर्गंधही असल्यामुळे माहितगार नागरिक व बोलगोपाळ या ठिकाणी कमीच जातात. हुतात्मा स्मारक व बाजूची जिल्हा परिषद शाळा व क्रीडांगण हे टवाळखोरांचा ‘लव्ह-पाईन्ट’ बनला आहे. त्याचा त्रास उद्यानात येणार्यांना होत आहे. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व बालगोपाळ मोठ्या प्रमाणात आपला वेळ व्यतीत करण्यासाठी येतात. सध्या उन्हाळी सुट्टीचा हंगाम सुरू आहे. यामुळे बालगोपाळांचा खेळण्याचा आनंद हिरावला जात आहे. उदगीर शहराच्या बीदर रस्त्यावर असलेल्या अहिल्यादेवी होळकर उद्यानात पालिकेकडून साफसफाई होत नसल्यामुळे या उद्यानात असलेल्या कचराकुंडीची दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाणही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. बालगोपाळांसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाचा ठेवा असलेल्या या उद्यानात पालिकेने सुरक्षा गार्डच्या नेमणूका करून या उद्यानाची झालेली दूरावस्था दूर करावी अशी मागणी उदगीरवासियांची आहे. (वार्ताहर) उद्यानाची साफसफाई करण्यात यावी उदगीर शहरात असलेल्या सर्व उद्यानात पालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. बनशेळगी तलावाशेजारी असलेल्या उद्यानात पालिकेचे कर्मचारी पाठवून साफ-सफाई करण्यात यावी, अशी प्रतिक्रिया उदगीर पालिकेचे अभियंता रमेश मोरे यांनी दिली. उदगीर शहरात असलेली व बनशेळकी तलावाशेजारील असलेल्या पालिकेच्या मालकीच्या उद्यानात घरच्या मंडळीसह बाल-गोपाळांना घेऊन जावे वाटते, मात्र या ठिकाणी पालिकेची सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या उद्यानात बाल-गोपाळांना व घरच्या मंडळींना जाण्याची इच्छा होत नाही. परिणामी नागरिकांना कुठल्यातरी कट्ट्याचा आधार घ्यावा लागतो, असे मत अनंत आपसिंगेकर यांनी व्यक्त केले. उदगीरात असलेल्या उद्यानात लहान लेकरांना व शाळकरी मुलींना घेऊन जाणे म्हणजे स्वत:वर आपत्ती ओढवून घेण्यासारखे आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षक बापूराव बोधले यांनी व्यक्त केले.