गंगापूर तालूका : ऑन दी स्पॉट रिपोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:05 IST2021-05-10T04:05:52+5:302021-05-10T04:05:52+5:30
गंगापूर तालुक्यातील स्थिती : सोशल डिस्टन्सचा फज्जा विवाह कार्यक्रम, अंत्यविधीत नियमांचे होते पालन जयेश निरपळ गंगापूर : कोरोनाच्या दुसऱ्या ...

गंगापूर तालूका : ऑन दी स्पॉट रिपोर्ट
गंगापूर तालुक्यातील स्थिती : सोशल डिस्टन्सचा फज्जा विवाह कार्यक्रम, अंत्यविधीत नियमांचे होते पालन
जयेश निरपळ
गंगापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील सात गावात बाधितांची संख्या वेगाने वाढली. रुग्णवाढ व मृत्यूचे प्रमाण चारपट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या देखील वाढतच असल्याने आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणा हतबल बनली आहे.
तालुक्यात आतापर्यंत एकूण ६,५६७ जणांना बाधा झाली आहे, तर १२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत एप्रिलच्या मध्यात कोरोनारूपी राक्षसाने रौद्ररूप धारण केल्याने पहिल्या लाटेच्या तुलनेत रुग्णवाढीचा व मृत्यूचा वेग चारपटीने वाढला आहे. १ फेब्रुवारीपासून आतापर्यंत म्हणजे सव्वातीन महिन्यात एकूण ३,७४८ रुग्ण आढळले आहेत. यात ६३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील एकूण १९६ गावांपैकी १५६ गावांत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. दुसऱ्या लाटेतील ४७ टक्के रुग्ण गंगापूर, लासुर, वाळूज, रांजणगाव शे.पू., भेंडाळा, वाहेगाव, कायगाव या सात गावांत असून एकूण मृत्यूच्या ५६ टक्के मृत्यू याच गावांत झाले आहेत.
गंगापूर, लासुर, वाळूज व रांजणगाव शे.पू. या प्रत्येक गावाची लोकसंख्या साधारण ३५ ते ४० हजाराच्या घरात असून दुसऱ्या लाटेत येथे अनुक्रमे ७९३, ३०९, २५६ व १८१ रुग्ण आढळले आहे. गंगापुरात २५, तर लासुरमध्ये १३, रांजणगावला ९, तर वाळूजमध्ये १२ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल वाहेगाव ११२, भेंडाळा ९८ व कायगाव ८२ येथे सर्वाधिक रुग्ण आहेत.
गंगापूर, लासूर स्टेशनमध्ये तपासणीसाठी गर्दी
गंगापूर व लासूर येथे तपासणीसाठी आजुबाजूच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्यामुळे नागरिकांना ताटकळत बसावे लागते. भेंडाळा येथे स्वतंत्र आरोग्य केंद्र असून कायगावचे नागरिक भेंडाळा येथेच तपासणी करतात. वाहेगावदेखील याच केंद्रात येत असले तरी या दोन्ही गावांतील अंतर ३० किलोमीटर असल्याने नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. गावकऱ्यांना गंगापूर जवळ असल्याने ते शहरात तपासणी करतात. मात्र वाहेगाव व नेवरगाव पंचक्रोशीसाठी स्वतंत्र आरोग्य उपकेंद्राची मागणी यानिमित्ताने केली जात आहे.
जिथे हॉट स्पॉट तिथे नियमांचे उल्लंघन
हॉट स्पॉट असलेल्या प्रत्येक गावात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. रुग्णसंख्या वाढत असूनही प्रशासनाचा वचक नसल्याने नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र सगळीकडेच आहे. शहर व लासुर येथे अकरा वाजेपर्यंत लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवून नागरिक रस्त्यावर आढळतात, तर भेंडाळा व कायगाव येथे कंटेन्मेन्ट झोन आहे. वाहेगाव येथे ग्रामपंचायतीच्यावतीने नाकाबंदी केली असून येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी केली जाते.
ग्रामसमित्या फक्त कागदावरच
बऱ्याच ठिकाणी ग्रामदक्षता समित्यांचा कारभार कागदावरच पाहायला मिळतो. कोरोनाच्या उद्रेकामुळे नागरिक भयभीत झाल्याने समितीचे पाहिजे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासनाच्यावतीने अपेक्षेप्रमाणे पाठपुरावा केला जात नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. ग्रामीण भागात लसीकरणाचे महत्त्व पटले असले तरी लसीचा साठा उपलब्ध नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे.