छत्रपती संभाजीनगर : मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची शहरात २५ मंदिरे आहेत. मात्र, श्रीरामभक्त हनुमानाची तब्बल २१२ मंदिरे शहरात आहेत. जाधवमंडीतील जबरे हनुमान, कासारी बाजारातील लंगोटिया हनुमान, नागोसानगरातील कानफाटे हनुमान, पिसादेवी येथील चपटेदान हनुमान, गुलमंडीवरील सुपारी हनुमान अशी अनेकविध मंदिरे असून त्या नावामागील रहस्यही तेवढेच मनोरंजक आहेत. मग, २१२ पैकी शनिवारी हनुमान जयंतीला कोण कोणत्या मंदिरात तुम्ही दर्शनाला जाणार आहात, याची यादीच करुन ठेवा.
९५ मंदिरांचे नामकरण नाही१२ एप्रिलला बजरंगबलीचा जन्मोत्सव सर्वत्र साजरा करण्यात येणार आहे. सर्व शहराप्रमाणे छत्रपती संभाजीनगरातही श्रीरामापेक्षा हनुमानाची मंदिरे जास्त आहेत. २१२ मंदिरांत जाऊन दर्शन घेण्यासाठी काही महिने लागतील. यात २५ जागृत हनुमान मंदिरे, २४ दक्षिणमुखी हनुमान मंदिरे, १४ संकटमोचन हनुमान मंदिरे, ५ पवनपुत्र हनुमान मंदिरे, ५ महारुद्र हनुमान मंदिरे आहेत. विशेष म्हणजे ९५ हनुमान मंदिरांचे नामकरणच झालेले नाही.
हनुमानाला ‘गंगाधन’ नाव कसे दिले?हनुमान बैठक असलेला व ७ फूट उंचीचा ‘गंगाधन हनुमान’ कुठे आहे, हे अनेक शहरवासीयांना माहिती नाही. हे बलशाली गंगाधन हनुमानाचे मंदिर नवाबपुरा परिसरात आहे. या मूर्तीला ५२ वर्षे होत आहेत. या मूर्तीची स्थापना नारायणसिंह होलिये यांनी केली. आई गंगाबाई व वडील धनिरामसिंह यांच्या नावाचे एकत्रीकरण करीत ‘गंगाधन’ असे हनुमानाला नाव दिले. हनुमान बैठक असलेले शहरातील हे एकमेव मंदिर आहे. मूर्तीला शेंदूर लावण्यात आला असून. १५ किलो चांदीचे अलंकार काढून ठेवण्यात आले आहेत. शनिवारी पहाटे पूजेच्या वेळी सर्व अलंकार हनुमंतरायाला घालण्यात येतील, अशी माहिती जयसिंह होलिये यांनी दिली.
राजाबाजारातील ‘गणपती-हनुमान’राजाबाजारात ‘गणपती-हनुमान’चे मंदिर आहे. १७५ वर्षांपूर्वी मंदिराचे पुजारी ठाकूरदास बाबा यांच्या स्वप्नात आले की, जिन्सीमधील एका विहिरीत गणपती व हनुमानाच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती विहिरीतून काढण्यात आल्यावर त्यांची विधिवत स्थापना बालाजी मंदिरात करण्यात आली. तेव्हापासून या मूर्ती आजूबाजूलाच असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली.