ट्रॅक्टर चोरणारी टोळी ग्रामीण पोलिसांनी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:04 IST2021-06-01T04:04:41+5:302021-06-01T04:04:41+5:30

औरंगाबाद : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री पकडली. आरोपींकडून दोन ट्रॅक्टर ...

The gang of tractor thieves was caught by the village police | ट्रॅक्टर चोरणारी टोळी ग्रामीण पोलिसांनी पकडली

ट्रॅक्टर चोरणारी टोळी ग्रामीण पोलिसांनी पकडली

औरंगाबाद : शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री पकडली. आरोपींकडून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. शेख समीर शेख दादा शेख रज्जाक (वय २८, रा. वडोद बाजार, ता. फुलंब्री), अमोल भाऊसाहेब खमाट (२६, रा. उमरावती), ज्ञानेश्वर ऊर्फ ज्ञान्या विष्णू धांडे (२४, रा. वडोदबाजार ), गजानन शंकर तुपे (३६, रा. नरला, ता. फुलंब्री), समीर नशीर पठाण (३६, रा. खंडाळा, ता. वैजापूर) आणि कलीम बेग सलीम बेग (४८, रा. देवगांव रंगारी, ता. कन्नड) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, १४ मे च्या रात्री लाडसावंगी येथील रफिक गफूर बागवान यांच्या मालकीचे ट्रॅक्टर चोरीला गेले होते. याविषयी त्यांनी करमाड ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर २७ मेच्या रात्री नागापूर (ता. कन्नड) येथील शेतकरी ऐतशाम नासेर काजी यांचे ७ लाख रुपये किमतीचे ट्रॅक्टर आणि ट्रॉली चोरट्यांनी पळविले होते. या दोन्ही घटनांनंतर पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गणेश राऊत, हवालदार संजय काळे, बाळू पाथरीकर, नदीम शेख, वाल्मीक निकम, बाबासाहेब नवले, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मेटे, योगेश तरमळे यांनी केलेल्या तपासानंतर पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी शेख समीर याला ताब्यात घेतले. सुरुवातीला तो मी नव्हेच असे म्हणणाऱ्या समीर पोलिसांनी खाक्या दाखविताच पोपटासारखा बोलू लागला. नागापूर आणि लाडसावंगी येथे ट्रॅक्टर चोरी साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली त्याने दिली. त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितल्यावर पोलिसांनी एकापाठोपाठ त्याच्या तीन साथीदारांना पकडले.

=================

विक्रीपूर्वीच ट्रॅक्टर जप्त

आरोपींंनी चोरलेले ट्रॅक्टर आरोपी समीर पठाण आणि कलीम बेग यांच्याकडे ठेवले होते. हे दोन्ही आरोपी ट्रॅक्टर विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना पोलिसांनी त्यांना गाठले. तेव्हा त्यांनी लपवून ठेवलेले ट्रॅक्टर जप्त केले.

====================

समीर आणि गजानन तुपे अट्टल चोर

आरोपी समीर आणि गजानन तुपे हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहेत. त्यांच्याविरुद्ध हायवा चोरी, घरफोडी, दुचाकीचोरीचे गुन्हे नोंद आहेत. समीर वर्षभरापूर्वी, तर तुपे हा सहा महिन्यांपूर्वी जामिनावर जेलमधून बाहेर आले होते.

Web Title: The gang of tractor thieves was caught by the village police