गणेश मूर्ती बनविण्याची कला ठरली शिक्षणासाठी आधार !
By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-04T00:34:59+5:302014-08-04T00:50:05+5:30
तामलवाडी : बालवयात अवगत झालेली कला तिचा वापर शिक्षणाच्या खर्चाकरिता होत आहे.
गणेश मूर्ती बनविण्याची कला ठरली शिक्षणासाठी आधार !
तामलवाडी : बालवयात अवगत झालेली कला तिचा वापर शिक्षणाच्या खर्चाकरिता होत आहे. गणपती मूर्ती तयार करुन तिची विक्री करणे व मिळालेल्या नफ्यातून तिघा बहिण-भावंडाचा शिक्षणाचा खर्च भागवला जातो. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) गावातील १३ वर्षाचा परवेज नावाचा मुलगा गणपतीच्या मूर्त्या तयार करीत आहे.
पिंपळा गावात बापू शेख हे पत्नी व तीन मुलांसह राहतात. कोरडवाहू पाच एकर जमिनीवर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागविणार. यासाठी वडील बापू याने खासगी कंपनीत काम धरले आणि वयाच्या ११ व्या वर्षाच्या परवेज याने बालवयात अवगत झालेली कला अंमलात आणली. गावात कुंभाराने विक्री आणलेल्या गणपती मूर्तीचे निरीक्षण बारकाईने करुन सलग २ वर्ष हाताने गणेश मूर्ती बनविल्या. गतवर्षी ५२० मूर्ती बनवून त्याची विक्री गावात केली. सलग दोन वर्षापासून परवेज शेख मूर्ती बनविण्याचे काम करीत आहे. गणेशोत्सवाचे वेध लागण्याअगोदर दीड महिना मूर्ती बनविण्याचे काम हाती घेतो. दिवसभर शाळा, गुरुजींनी सांगितलेला अभ्यास, नंतर मुर्त्या बनविण्याचे काम करतो. दोन वर्षापासून मूर्ती विक्रीतून मिळालेल्या नफ्यातून परवेज स्वत:सह बहिण आफ्रीन, रेश्मा या तिघांचा शिक्षणाचा वार्षिक खर्च भागवितो. बहिण आफ्रीन ही तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात १० वीत शिक्षण घेत आहे. तर परवेज व रेश्मा हे दोघे गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहे. आई नौशाद ही मोलमजुरीसाठी कामाला जाते. यंदा बापू शेख याने परवेजला मूर्ती तयार करण्यासाठी लोखंडी साचा आणला आहे. यासाठीचा कच्चामाल सोलापूरहून आणला जातो. वर्षभरातील दीड महिना परवेज हा मूर्ती बनविण्यासाठी कष्ट घेतो. या मुर्तींना परिसरातील गावागावातून मागणी असल्याचे परवेज शेख याने नमूद केले. (वार्ताहर)
मूर्ती शहरातील बाजारात आणणार
सलग महिनाभर तयार केलेल्या गणेश मूर्त्यांना रंगकाम करुन उत्सवापूर्वी या मूर्त्या तुळजापूर, सोलापूर शहरातील बाजारात नेणार आहे. गतवर्षी एका मूर्तीस ४० रुपये भाव मिळाला होता, असे परवेज याने सांगितले.