सत्ता सुंदरीचा खेळच न्यारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:06 IST2021-04-07T04:06:07+5:302021-04-07T04:06:07+5:30
विश्लेषण/स.सो.खंडाळकर सत्ता सुंदरीचा खेळच न्यारा असतो. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एक वडीलधारी; ...

सत्ता सुंदरीचा खेळच न्यारा
विश्लेषण/स.सो.खंडाळकर
सत्ता सुंदरीचा खेळच न्यारा असतो. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एक वडीलधारी; पण सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्ती नसली की, राजकारण कोणत्या थराला व टोकाला जाऊ शकते, याचा प्रत्यय आला.
चुटकीसरशी मित्र बनले...
राजकारणात युद्धात व प्रेमात सर्व काही माफ असते, असे उगाच म्हटले जात नाही. लोकसभा निवडणुकीनंतर एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे आणि विशेषतः सुभाष झांबड हे एका चुटकीसरशी मित्र बनले. विधानसभेचे सभापती बनल्यानंतर जिल्हा बँकेत मोठे वलय व वर्चस्व निर्माण केलेले हरिभाऊ बागडे हे पराभूत झाले तर कुठल्याही चर्चेत फारसे नसलेले अर्जुनराव गाढे पाटील हे तेरा मते घेऊन उपाध्यक्ष बनले.
खैरे यांची पत ... आणि दानवे यांची जबाबदारी...
माजी खासदार दिवंगत साहेबराव पाटील डोणगावकर यांचा वारसा लाभलेले कृष्णा पाटील डोणगावकर यांना उपाध्यक्ष बनता आले नाही. उलट त्यांना हे पद मिळू नये म्हणून सत्तार, काळे आणि झांबड यांना एकत्रित येऊन खेळी खेळावी लागली. बँकेच्या इतिहासात कधी नव्हे ती एकवटलेल्या शिवसेनेच्या शक्तीत फूट पडली. कॅबिनेट मंत्री असलेल्या संदिपान भुमरे यांच्यापेक्षा राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी बाजी मारली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर प्रत्यक्ष मतदानाच्या दोन दिवस आधी उडी घेऊन, अंबादास दानवे व हरिभाऊ बागडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे शिवसेनेतील उरलीसुरली पतही गेली, असेच चित्र निर्माण झाले आहे. नव्याने निवडून आलेले अंबादास दानवे हे जिल्हाप्रमुख, आमदार व शिवसेनेचे प्रवक्ते म्हणून कुठेतरी चुकले व ज्या पॅनलमधून निवडून आले, त्या पॅनलपासून दूर गेले, असेच म्हणावे लागेल. त्यांनी अधिक जबाबदारीने वागायला पाहिजे होते, असे बोलले जात आहे.
वारंवार गद्दारी....
बिनविरोध अध्यक्ष झाल्यामुळे नितीन पाटील यांचे काहीही नुकसान झाले नाही. कृष्णा पाटील डोणगावकर मात्र बदनाम झाले. ज्या पॅनलमधून निवडून आले त्या पॅनलला रामराम ठोकून त्यांनी सत्तारूढ पॅनलशी जवळीक साधली; पण उपाध्यक्षपदासाठी ते गद्दार ठरले, अशी टीका अब्दुल सत्तार यांनी केली. त्यांच्या गद्दारीचा वारंवार अनुभव येतोय, असे ते म्हणाले.
एकदाची निवडणूक होऊन गेली...
कोरोनाचा कहर चालू असताना एकदाची बँकेची निवडणूक होऊन गेली. आता बँकेबद्दल काही बरे-वाईट ऐकायला येऊ नये, ही बँक भ्रष्टाचारमुक्त कशी होईल, अधिकाअधिक नफ्यात कशी येईल, याचा विचार संचालक मंडळाने केला पाहिजे. बँक शेतकऱ्यांचे हे पवित्र मंदिर आहे, हे केवळ म्हणण्यापुरते ठरू नये तर प्रत्यक्षात उतरावे शेतकऱ्यांच्या अडीअडचणींना प्राधान्य देऊन सहकार्याचे हात सतत पुढे राहावेत, हे आव्हान नितीन पाटील व त्यांचे संचालक मंडळ स्वीकारेल व त्यांना कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे झाले गेले विसरून सहकार्य करतील, अशी अपेक्षा बाळगणे गैर ठरू नये.