अंत्यविधी, वैद्यकीय, निकडीच्या कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:02 IST2021-05-04T04:02:11+5:302021-05-04T04:02:11+5:30
केवळ २० मिनिटांत मिळतो ई-पास पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष: १० दिवसात ९००९ नागरिकांनी घेतला लाभ औरंगाबाद : नातेवाइकांचा ...

अंत्यविधी, वैद्यकीय, निकडीच्या कामाला
केवळ २० मिनिटांत मिळतो ई-पास
पोलीस आयुक्तालयात स्वतंत्र कक्ष: १० दिवसात ९००९ नागरिकांनी घेतला लाभ
औरंगाबाद : नातेवाइकांचा अंत्यविधी, आजारी नातेवाइकाला रुग्णालयात न्यायचे अथवा भेटायला परजिल्ह्यात जायचे असेल तर संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यावर अवघ्या २० मिनिटात ई-पास मिळतो. औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयात ई-पास देण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेर प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत, परंतु महत्त्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यास परवानगी दिली जाते. याकरिता ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गेल्या १० दिवसात ९ हजार ९ नागरिकांनी ई-पास सुविधेचा लाभ घेतला.
बाहेरगावी जाणाऱ्या अर्जदाराने आणि त्याच्यासोबतच्या प्रवाशांना कोविड निगेटिव्ह असल्याचे चाचणी प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि पासपोर्ट फोटो अपलोड करावा लागतो. बाहेरगावी जाण्यासाठी कारण द्यावे लागते. हा अर्ज दाखल केल्यावर अवघ्या २० मिनिटात ई-पास मंजूर झाल्याचा अथवा नाकारल्याचा मेसेज मोबाइलवर येतो. औरंगाबाद शहरात २३ एप्रिलपासून ई-पासची सुविधा उपलब्ध झाली. आतापर्यंत ९ हजार ९ नागरिकांनी ई-पास सुविधेचा लाभ घेतला, यापैकी ३ हजार ५७२ जणांना ई-पास नाकारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. कागदपत्रे अपलोड न करणे, कोविड चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र न जोडणे आणि बाहेरगावी जाण्यासाठी सबळ कारण नसल्यामुळे हे अर्ज नाकारण्यात आले. अर्ज प्राप्त झाल्यावर २० मिनिटात त्यावर निर्णय घेतला जात असल्यामुळे शहर पोलीस विभागाकडे एकही अर्ज प्रलंबित राहत नसल्याचे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले.
=================
चौकट
ई-पाससाठी कारणे तीच
आजारी नातेवािकाला भेटायला जायचे, कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले, लग्नाला जायचे आहे, माहेरी असलेल्या पत्नीला आणायचे आहे, दवाखान्यात जायचे आहे, कंपनी बंद पडली मूळगावी जायचे आदी कारणे, ई-पासकरिता दिली जातात.
=====================
चौकट
ई-पाससाठी असा करावा अर्ज
परजिल्ह्यात जाण्यासाठी http://Covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. या संकेतस्थळावर विचारलेली माहिती भरून बाहेरील जिल्ह्यात अथवा राज्यात जाण्यासाठी कारण नमूद करणे बंधनकारक आहे. सबळ कारण सादर केल्याशिवाय ई-पास मिळत नाही.
================
चौकट==
या कागदपत्रांची आवश्यकता
ऑनलाइन अर्ज करताना अर्जदाराचे छायाचित्र, आधारकार्ड, आरटीपीसीआर अथवा अँटिजेन चाचणी कोविड निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अथवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र. ज्या आजारी नातेवाइकाला भेटायला जायचे तो ज्या रुग्णालयात ॲडमिट आहे, त्या रुग्णालयाचा फोन नंबर द्यावा, अथवा त्यांच्या आजारपणाचा एखादा पेपर अपलोड करावा.
======================
२० मिनिटात मिळतो निर्णय
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील नागरिकाने ई-पासकरिता ऑनलाइन अर्ज केल्यानंतर अवघ्या २० मिनिटात त्यांना त्यांचा इ पास मिळतो. अथवा पास नाकारण्यात आल्याच्या सबळ कारणासह मेसेज पाठविला जातो.