ट्रामा केअरला आणला २़१५ कोटींचा निधी
By Admin | Updated: July 30, 2014 00:50 IST2014-07-30T00:12:04+5:302014-07-30T00:50:08+5:30
उदगीर : उदगीर, जळकोट, देवणीकरांसाठी उदगीरमध्ये २०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते.

ट्रामा केअरला आणला २़१५ कोटींचा निधी
उदगीर : उदगीर, जळकोट, देवणीकरांसाठी उदगीरमध्ये २०० खाटांचे रुग्णालय मंजूर होते. परंतु निधी मिळत नव्हता. यासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पत्रे पाठवून, प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करावा लागला. विरोधी पक्षाचा असतानाही त्यांच्याकडून या रुग्णालयासाठी ३ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी आणला. आता ही उभी झालेली इमारत पाहून आमच्या नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटल्याचे समाधान वाटते, अशा शब्दात आ. सुधाकर भालेराव यांनी रुग्णालयाच्या भेटीवेळी काढल्या.
नव्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली. यानंतर ते म्हणाले की, उदगीर हे दीड लाख लोकसंख्येचे शहर आहे. लातूरपासून दोन तासाच्या अंतरावर असलेल्या या शहरातील सर्वसामान्यांसाठी चांगली वैद्यकीय सुविधा म्हणजे उपजिल्हा रुग्णालय. परिसरासह सीमाभागातील नागरिकांचाही उपचारासाठी उदगीरकडेच ओढा असल्याने रुग्णालयावर अतिरिक्त ताण होता. दुसरीकडे मंजूर असूनही फक्त निधी नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयातील २०० खाटांचा प्रस्ताव पडून होता. ही बाब ओळखून आ. भालेराव यांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेऊन पत्र लिहीले. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळेच उदगीरच्या २०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला एका झटक्यात निधी मिळून कामाला प्रारंभ झाला. आज उदगीर पालिकेशेजारील जागेत या रुग्णालयाची देखणी वास्तु उभी आहे. (वार्ताहर)
लवकरात लवकर उद्घाटन व्हावे ...
आ. सुधाकर भालेराव यांनी या इमारतीचे उद्घाटन लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. उपजिल्हा रुग्णालयात जागा कमी पडते आहे. रुग्णांना खाटा पुरत नाहीत. त्यामुळे या इमारतीचे उद्घाटन आरोग्य प्रशासनाने लवकरात लवकर करण्याची गरज आहे. जर याचे उद्घाटन लांबत असेल तर मी स्वत: उपजिल्हा रुग्णालयात जमिनीवर असलेले पेशंट उचलून नव्या इमारतीच्या खाटावर नेऊन झोपवेन असा इशाराही दिला.
ट्रामा केअरच्या कामालाही गती...
उदगीरमध्ये असलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामालाही निधीअभावी गती होती. परंतु या सेंटरलाही २़१५ कोटी इतका निधी आणण्यात आला. त्यामुळे या कामालाही गती मिळाली असून यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होणार असल्याचे आ. भालेराव यांनी यावेळी बोलताना सांगितले.