टंचाई काळातील विंधन विहिरी संथ गतीत
By Admin | Updated: April 24, 2015 00:38 IST2015-04-24T00:30:17+5:302015-04-24T00:38:47+5:30
सितम सोनवणे, लातूर लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही,

टंचाई काळातील विंधन विहिरी संथ गतीत
सितम सोनवणे, लातूर
लातूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, टंचाई काळात मंजूर झालेल्या विंधन विहिरींची कामे संथ गतीने होत आहेत. टंचाई काळात या विंधन विहिरी पूर्ण होतील की नाही, याची खात्री नाही. ३२२ पैकी १५३ विंधन विहिरींचे काम कासवगतीने सुरू आहेत. केवळ १६९ विहिरींची कामे पूर्ण झाली असून, या विहिरींना थोडेबहुत पाणी लागले असून, १२ विंधन विहिरी तर कोरड्याच आहेत.
जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतींच्या शिफारशीनुसार या विंधन विहिरी मंजूर केल्या आहेत. परंतु, टंचाई कक्ष आणि प्रशासन बेफिकीर असल्याने विहिरींच्या कामांना गती नाही. गेल्या तीन महिन्यांत ३२२ पैकी केवळ १६९ विंधन विहिरी पूर्ण झाल्या आहेत. १५३ विंधन विहिरींची कामे अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. १६९ मधील १२ विंधन विहिरी कोरड्याच आहेत. टंचाई काळात ही उपाययोजना केली असली, तरी ग्रामस्थांच्या घशाला मात्र कोरडच आहे. ग्रामस्थांची भटकंती थांबलेली नाही. एप्रिल महिन्यात कडाक्याचे उन्हं पडत आहे. ४१ अंशांवर तापमानाचा पारा गेला आहे. अशा स्थितीत ग्रामस्थ मात्र पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. इकडे प्रशासन विंधन विहिरींची कामे पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहेत.
लातूर तालुक्यात २१, औसा ४, निलंगा २३, रेणापूर १३, अहमदपूर ३२, चाकूर २१, शिरुर अनंतपाळ १०, उदगीर २३, देवणी १९, जळकोट तालुक्यात ३ नवीन विंधन विहिरी घेण्यात आल्या़ पाणीटंचाईच्या काळात या विंधन विहिरीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची व्यवस्था होईल, अशी आशा होती. मात्र ती फोल ठरली आहे. त्यासाठी यांत्रिकी विभागाच्या वतीने यांचे निरीक्षण तसेच हातपंप बसविण्याचे कामे केली जात आहेत़ टंचाई कालावधी संपत येत आहे तरी अजून १५३ नवीन विंधन विहिरींची कामे बाकी आहेत़ एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा सुरू असून, मे महिन्यात तर टंचाई अधिक भेडसावणार आहे. तरीही टंचाई काळातील विंधन विहिरी पूर्ण न झाल्यामुळे टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी या ३२२ नवीन विंधन विहिरीस मान्यता दिली आहे़ या मान्यतेनुसार जिल्हा परिषदेच्या उपअभियंता यांत्रिकी यांचे कार्यालयाने ग्रामपंचायतींना नवीन विंधन विहिरीचे काम सुरु करण्याचे आदेश दिले आहेत़ याआदेशानुसार ग्रामपंचायतींनी १६९ नवीन विंधन विहीरीचे कामे पूर्ण झाले आहे़ त्यांतील १५७ विंधन विहिरींना पाणी लागले आहे़ तर १२ विंधन विहिरी कोरड्या गेल्या आहेत़
४यातील ३३ विंधन विहिरीवर हात पंप बसविण्यात आले आहेत़ २० विंधन विहिरीवर विद्युतपंप बसविण्यात आले आहेत़ १६९ विंधन विहिरीची तालुकानिहाय परिस्थिती अशी आहे़ विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना करूनही कामाला गती नाही.