न्यायाधीशांसमोरच आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: August 17, 2014 01:45 IST2014-08-17T01:35:59+5:302014-08-17T01:45:20+5:30
औरंगाबाद : आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास ते आपल्याला जिवे मारून टाकतील, असे म्हणत एका तरुणाने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

न्यायाधीशांसमोरच आत्महत्येचा प्रयत्न
औरंगाबाद : कोर्टाचे नियमित कामकाज सुरू असताना आरोपींना जामिनावर मुक्त केल्यास ते आपल्याला जिवे मारून टाकतील, असे म्हणत एका तरुणाने न्यायाधीश, वकील आणि पोलिसांसमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही थरारक आणि खळबळजनक घटना शनिवारी दुपारी साडेतीन ते चार वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात घडली.
प्रकाश अर्जुन काळे ऊर्फ पक्या दारूवाला (२६, रा. राजीवनगर, रेल्वे स्टेशन) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकाश काळे याच्या तक्रारीवरून २५ जुलै रोजी आरोपी विनोद मारुती भालेराव, विजय मारोती भालेराव, मंगेश मारोती भालेराव आणि एका अल्पवयीन मुलाविरोधात (रा. राजीवनगर) मारहाण करून ११ हजार ५०० रुपये आणि एक मोबाईल हॅण्डसेट हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात भालेराव बंधूंना क्रांतीचौक पोलिसांनी १२ आॅगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे सहायक पोलीस निरीक्षक अशोक राठोड यांनी त्यांना आज दुपारी साडेतीन ते पावणेचार वाजेच्या सुमारास मुख्य न्यायदंडाधिकारी डी.के. अनभुले यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी आरोपींचे वकील आणि पोलिसांतर्फे सहायक पोलीस अभियोक्ता एन.वाय.किनगावकर हे न्यायालयासमोर बाजू मांडत होते. त्याचवेळी प्रकाश काळे हा स्कूल बॅग हातात घेऊन कोर्ट हॉलमध्ये येऊन उभा राहिला. यावेळी आरोपींना जामीन देऊ नका, अन्यथा ते मला जिवे मारून टाकतील, असे म्हणत त्याने हातातील बॅगमधून रॉकेलची कॅन बाहेर काढली आणि ते स्वत:च्या अंगावर ओतण्यास सुरुवात केली. याप्रसंगी न्यायालयाच्या दारात उभे असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल पी.एन.अग्रवाल, सहायक निरीक्षक अशोक आव्हाड आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यास पकडले. अग्रवाल यांनी त्याच्या हातातील कॅन हिसकावून घेतली. पोलिसांनी त्याच्या खिशातील लायटर जप्त केले. त्यानंतर त्यास तातडीने क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यास घाटीत दाखल करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
कोर्ट हॉलमध्ये रॉकेलचा वास
कोर्ट हॉलमधील न्यायाधीशांच्या डेस्कसमोर वकील मंडळी उभी राहतात, त्या ठिकाणी हा प्रकार घडला. खळबळजनक घटनेच्या वेळी प्रकाश काळे यास पकडताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंगावरील कपडेही रॉकेलने भिजले. याप्रसंगी बरेच रॉकेल हॉलमधील फरशीवर सांडले. परिणामी कोर्ट हॉलमधून रॉकेलचा वास येत होता.
आत्महत्येचा प्रयत्न करणाराही सराईत गुन्हेगार
न्यायाधीशांसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणारा प्रकाश काळे याला अवैध दारू विक्री करताना पोलिसांनी अनेकदा पकडलेले आहे. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.