तेजा ते रसगुल्ला, लाल मिरची स्वस्त झाली; पण अतितिखट, झणझणीत खाणे पडू शकते महाग
By प्रशांत तेलवाडकर | Updated: February 27, 2024 17:53 IST2024-02-27T17:52:51+5:302024-02-27T17:53:26+5:30
तिखट झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड

तेजा ते रसगुल्ला, लाल मिरची स्वस्त झाली; पण अतितिखट, झणझणीत खाणे पडू शकते महाग
छत्रपती संभाजीनगर : तिखट, झणझणीत खाणाऱ्यांसाठी लाल मिरची गोड झाली... असा मथळा वाचल्यावर तुम्ही थोडे संभ्रमात पडला असाल... पण, बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर याची सत्यता लक्षात येते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नवीन लाल मिरचीचे भाव निम्म्याने कमी झाले आहेत. यामुळे खवय्यांसाठी ही बातमी गोडच ठरत आहे. मिरची स्वस्त झाली असली तरी सावधान, कारण अतितिखट खाणेही पडू शकते महाग...
कशामुळे लाल मिरची स्वस्त
सर्वाधिक लाल मिरची उत्पादक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश होय. या राज्यात मिरचीचे उत्पादन यंदा मुबलक प्रमाणात झाले आहे. तसेच, कर्नाटक राज्यातही लाल मिरचीचे उत्पादन समाधानकारक आहे. यामुळे नवीन लाल मिरचीची आवक वाढली व भाव कमी झाले आहेत.
लाल मिरचीचे भाव किती कमी झाले?
प्रकार फेब्रुवारी २०२३ (किलो) फेब्रुवारी २०२४
१) तेजा (कर्नाटक) ३०० ते ३५० रु. --- २५० ते ३०० रु.
२) ब्याडगी - ७०० ते ७५० रु---३०० ते ३५० रु.
३) गुंटूर (आंध्र प्रदेश) ३५० ते ४०० रु. ---२५० ते २८० रु.
४) चपाटा ५०० ते ५५० रु.--- ३०० ते ४०० रु.
५) रसगुल्ला ९५० ते १००० रु.---६५० ते ७५० रु.
कमी तिखट खाणाऱ्यांसाठी ‘रसगुल्ला’
१) जास्त तिखट खाणाऱ्यांसाठी कर्नाटकची तेजा मिरची प्रसिद्ध आहे.
२) कमी तिखट खाणाऱ्यांनी ब्याडगी, रसगुल्ला ही मिरची खरेदी करावी.
३) भाजीत तर्रीदार व घट्टपणा येण्यासाठी चपाटा मिरचीचा वापर करावा.
४) मध्यम तिखटपणा ‘गुंटूर’ मिरचीत असतो.
५) शहरात तिखट खाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
६) शहरात तेजा व गुंटूर मिरची ८० टक्के विकली जाते.
हंगामाला सुरुवात
उन्हाळ्यात लाल मिरची खरेदीचा हंगाम असतो. या काळात नवीन मिरची बाजारात येते. भाव कमी असल्याने ही लाल मिरची खरेदी करून तिचे वर्षभर पुरेल एवढे तिखट करून ठेवले जाते. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भाव कमी असल्याने वार्षिक मिरची खरेदीसाठी ग्राहक बाजारात येत आहेत.
- स्वप्निल जैन, व्यापारी