छत्रपती संभाजीनगर : भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेवर प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची गुरुवारी बिनविरोध निवड झाली. शुक्रवारी केणेकर पद व गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
९०च्या दशकात गुलमंडीत नारळ विक्री करणारे केणेकर यांचा आमदार होण्यापर्यंतचा प्रवास रोमहर्षक आहे. भाजपचा मायक्रो ओबीसी चेहरा असलेले केणेकर यांनी १९८८ साली अ.भा.वि.प.मधून राजकीय प्रवासाचा आरंभ केला. पुढे भाजप वॉर्ड अध्यक्ष ते प्रदेश उपाध्यक्ष असे १२ वर्षे संघटनात्मक काम त्यांनी केले. १५ वर्ष मनपात नगरसेेवक म्हणून काम केले. उपमहापौर म्हणून पक्षाने संधी दिली. शहराध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस या पदापर्यंत त्यांनी काम केले. बी.कॉम.पर्यंत शिक्षण झालेले केणेकर सध्या ५५ वर्षांचे आहेत. मायक्रो ओबीसी चेहरा म्हणून केणेकर यांचा विचार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने केणेकर यांचे नाव विधान परिषदेसाठी निश्चित झाले.
गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, केणेकर यांनी बाजी मारली. दरम्यान, गुरुवारी केणेकर यांना विधान परिषद सदस्यपदी बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित करीत नियुक्तीचे प्रमाणपत्र मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी प्रदान केले. यावेळी ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, केणेकर यांच्या पत्नी वैशाली केणेकर आदींची उपस्थिती होती.
विश्वास सार्थ ठरविणार...मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन. समाजातील प्रत्येक घटकासाठी मी आजवर धावून गेलो आहे. त्यामुळेच मला ही संधी मिळाली आहे.- संजय केणेकर, नवनिर्वाचित आमदार