सेंद्रीय शेतीतून फुलविली आंब्याची बाग
By Admin | Updated: June 11, 2014 00:33 IST2014-06-11T00:12:38+5:302014-06-11T00:33:38+5:30
प्रकाश मिरगे , जाफराबाद सेंद्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून नळविहरा (ता. जाफराबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय मोरे यांनी केशर आंब्यांची बाग फुलविली आहे.

सेंद्रीय शेतीतून फुलविली आंब्याची बाग
प्रकाश मिरगे , जाफराबाद
सेंद्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करून नळविहरा (ता. जाफराबाद) येथील प्रगतिशील शेतकरी संजय मोरे यांनी केशर आंब्यांची बाग फुलविली आहे. एवढेच नव्हे तर अंतर्गत पीक म्हणून सीताफळाची लागवड केली असून, सीताफळाची बागही आता बहरात आली आहे.
जाफराबाद तालुक्यात शेतीचे तंत्रज्ञान फारसे विकसीत नाही. येथील शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करत आले आहेत. मात्र, संजय मोरे या प्रगतीशील शेतकऱ्याने विविध ठिकाणचा अभ्यास करून वेळोवेळी कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत खडकाळ तसेच माळरानावर आंबा तसेच सीताफळाची बाग फुलविली आहे.
मोरे यांनी आपल्या शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा मानस केला. त्यानंतर त्यांनी विविध ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आणि वातावरणाचा अभ्यास केला. अंबडसह जिल्ह्यातील इतर भागांमध्येही केशर आंब्यांचे उत्पादन घेण्यात आले. त्यास चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली. त्यामुळेच त्यांनी ९ वर्षांपूर्वी आपल्या शेतात सुमारे साडेतीन हजार आंब्यांची लागवड केली. त्यात प्रामुख्याने गांडूळ खतांसह सेंद्रीय खतांचाच वापर केला. खते, पाणी आणि औषधांची फवारणी करत झाडांची योग्य निगा राखली. तब्बल नऊ वर्षे ती बाग जिवापाड जपली. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, केशर आंब्यांचे मोठे उत्पादन हाती आले आहे. विशेषत: आंबा पिकविण्यासाठी रसायनांचा उपयोग न करता शेतातीलच पंपहाऊसमध्ये हे आंबे पिकविण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्णपणे नैसर्गिकरीत्या पिकविलेले आंबे ग्राहकांना मिळत आहेत. गावरान आंबा फारसा उपलब्ध नसल्यामुळे केशर आंब्याला बाजारामध्ये विशेष मागणी आहे. केशर आंब्याच्या फळबागेसोबत अंतर्गत पिक म्हणून सीताफळाचीही लागवड केली. या बागेलाही मोहर आला आहे. या हंगामात सीताफळातूनही चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा मोरे यांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात दळणावळणाच्या साधनांअभावी फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना स्वत: मार्केटिंंग करावी लागत आहे. तरीसुद्धा तालुक्याचा केशर आंबा सातासमुद्रापार पोहोचविण्याचे काम संजय मोरे व हरिश मोरे यांनी केले आहे.
एकाच जागेवर पाच कलमा एकत्र करून एक खोड तयार केले आहे. या वर्षात अवकाळी पावसाने वेळोवेळी हजेरी लावून या रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तरीही मेहनत आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर विक्रमी उत्पादन होत आहे.
कृषी विभागाच्या वतीने खरपुडीत प्रदर्शनादरम्यान मोरे यांच्या केशर आंबा स्टॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.