महावीर चौक उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली
By Admin | Updated: September 16, 2014 01:37 IST2014-09-16T01:27:08+5:302014-09-16T01:37:17+5:30
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सकल विचार करूनच घेण्यात आला आहे,

महावीर चौक उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा; विरोधातील याचिका फेटाळली
औरंगाबाद : रेल्वेस्टेशन ते मध्यवर्ती बसस्थानक रोडवरील महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सकल विचार करूनच घेण्यात आला आहे, असे नमूद करून दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारणीस विरोध करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सोमवारी फेटाळली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून महावीर चौक येथे पूल उभारण्यात येत आहे. दक्षिणोत्तर उड्डाणपूल उभारण्यास आव्हान देणारी जनहित याचिका औरंगाबाद बस ओनर्स अँड टॅ्रव्हल एजंट असोसिएशन आणि इतर १४ जणांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. याचिकेत नमूद केले होते की, पूल दक्षिण-उत्तर उभारणे जनहितविरोधी आहे. तो पूर्व-पश्चिम असा आवश्यक आहे.
केवळ संरक्षण विभागाकडून जमीन उपलब्ध होणार नाही, या कारणासाठी हा पूल पूर्व-पश्चिम असा टाळण्यात आला आहे. शिवाय रस्ते विकास महामंडळाने या उड्डाणपुलाकरिता संरक्षण विभागाकडे रीतसर जागेची मागणी केली नाही. वाहतूक शाखेच्या सहायक आयुक्तांनी महावीर चौकातील उड्डाणपूल दक्षिणोत्तर असा उभारणे अयोग्य असल्याचा अभिप्राय दिलेला आहे. जालना रोडवरील वाहतूक, अहमदनगर, नाशिककडून येणारी वाहने आणि प्रवाशांची संख्या ही दक्षिणोत्तर वाहन संख्येपेक्षा पाचपट अधिक असल्याचे नमूद केले होते. त्यामुळे उड्डाणपूल पूर्व-पश्चिम असाच उभारावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
याचिकेवर सुनावणी झाली असता रस्ते विकास महामंडळातर्फे अॅड. एस. व्ही. अदवंत यांनी न्यायालयास सांगितले की, शहराच्या दक्षिणेकडील भागात होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल वसाहतीमुळे (डीएमआयसी) दक्षिणोत्तर वाहनांची संख्या वाढणार आहे. पैठण लिंक रोडमुळे नगर, नाशिककडून येणाऱ्या वाहनांना पर्याय मिळाला आहे. जालना रोडकडून जाणारी वाहतूकही झाल्टा फाट्यापासून बीड बायपासने जाते. परिणामी जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी झाला.
शिवाय इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार उड्डाणपुलाची उंची साडेपंधरा मीटर ठेवण्यात येत असून, पुलाखाली दोन्ही बाजूंनी ५० फुटांची जागा सोडण्यात आली आहे. संरक्षण विभागाकडून जागा मिळण्यासंदर्भात आधीचा अनुभव लक्षात घेता पुलाचे काम जलदगतीने होण्यासाठी दक्षिणोत्तर पूल उभारणीचा निर्णय सकल विचार करून घेण्यात आल्याचे शपथेवर सांगितले. यावेळी पुलाचे काम करणाऱ्या सत्यसाईबाबा कन्स्ट्रक्शनतर्फे अॅड. प्रदीप देशमुख यांनी पुलाच्या बांधकामाच्या प्रगतीची माहिती शपथपत्राद्वारे दिली.
उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ए. व्ही. निरगुडे आणि न्यायमूर्ती ए. आय. एस. चिमा यांनी महावीर चौकात दक्षिणोत्तर उड्डाणपुलास आव्हान देणारी याचिका फेटाळली.
शहराच्या दक्षिणेकडील भागात होऊ घातलेल्या दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल वसाहतीमुळे (डीएमआयसी) दक्षिणोत्तर वाहनांची संख्या वाढणार आहे. पैठण लिंक रोडमुळे नगर, नाशिककडून येणाऱ्या वाहनांना पर्याय मिळाला आहे.
जालना रोडकडून जाणारी वाहतूकही झाल्टा फाट्यापासून बीड बायपासने जाते. परिणामी जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी झाला.