तुळजापुरातील तीनशे कुटुंबांना मोफत पिण्याचे पाणी !
By Admin | Updated: April 4, 2016 00:39 IST2016-04-04T00:25:49+5:302016-04-04T00:39:28+5:30
तुळजापूर : अख्खा जिल्हा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मात्र,

तुळजापुरातील तीनशे कुटुंबांना मोफत पिण्याचे पाणी !
तुळजापूर : अख्खा जिल्हा भीषण दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत मात्र, पाणी विक्रीच्या धंद्याला सुगिचे दिवस आले आहेत. पाचशे लिटर पाण्यासाठी शंभर ते दिडशे रूपये मोजावे लागत आहे. एकीकडे हे चित्र असतानाच दुसरीकडे ‘आपण समजाचे काही तरी देणे लागतो’ या भावनेतून शहरातील सुनिल रोचकरी यांनी सुमारे ३०० वर कुटुंबियांना मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. स्व:खर्चातून अॅरोप्लॅन्ट उभारण्यात आला आहे. हा उपक्रम ३६५ दिवस म्हणजेच वर्षभर राबविला जाणार आहे.
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. त्यामुळे विहीर, कुपनलिका या जलस्त्रोतांसोबतच प्रकल्पही झपाट्याने कोरडे पडू लागले आहेत. याचा परिणाम पाणीपुरवठ्यावरही होवू लागला आहे. सध्या तुळजापूर शहरामध्ये आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गरजेच्या प्रमाणात पाणी मिळत नसल्याने नागरिकांना टंचाईला तोंड द्यावे लागते. पैसे मोजूनही वेळेवर शुद्ध पाणी मिळेल, याची शाश्वती नाही. हीच बाब लक्षात घेवून सुनील रोचकरी यांनी शहरातील खडकाळ गल्ली, मंकावती गल्ली आणि साळुंके गल्ली येथील रहिवाशांना मोफत शुद्ध पाणीपुवठा करण्याचा निर्णय घेतला. रोचकरी यांच्या शेतातील कुपनलिकेचा बऱ्यापैकी पाणी आहे. हे पाणी दोन टँकरच्या माध्यातून घरी वाहून आणले जाते. आणि अॅरोप्लॅन्टच्या माध्यमातून ते शुद्ध केले जाते. त्यानंतर हे पाणी प्रति कुटुंब जार या प्रमाणे पुरवठाकेले जाते. पाणी वाटपात कोणावरही अन्याय होवू नये, म्हणून त्यांनी कार्ड पद्धत अवलंबिली आहे. सुमारे ३०० वर कुटुंबाना कार्ड देण्यात आली आहेत. हे कार्ड क्रॅश केल्यानंतर एक जार शुद्ध पाणी दिले जाते. यासाठी एक रूपयाही घेतला जात नाही. रोचकरी यांच्या या उप्रकमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सध्या खाजगी जलशुद्धीकरण प्रकल्पचालकांची चांगलीच चलती आहे. वीस लिटर शुद्ध पाण्याच्या जारसाठी २५ ते ३० रूपये मोजावे लागत आहेत. अशा परिस्थितीत सुनील रोचकरी यांनी मात्र, उपलब्ध पाणी जनतेला तेही मोफत पुरविण्याचा निर्णय घेवून लाखो रूपये खर्च करून प्लॅन्ट उभारला. टँकरच्या माध्यमातून शेतातून पाणी आणून ते शुद्ध करून कुटुंबांना मोफत दिले जाते. तसेच घरकामासाठीही प्रतिदिन दोन टँकर म्हणजेच चोवीस हजार लिटर मोफत पुरवठा केले जाते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होवू लागले आहे.
मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन
४सुनील रोचकरी यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन २ एप्रिल रोजी आ. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते झाला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी सभापती सचिन पाटील, भारत कदम, अनंत कोंडो, ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ, किशोर कदम, विनित कोंडो, संतोष बोबडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुनील रोचकरी यांनी सुरू केलेला हा उपक्रम सर्वसामान्यांच्या हिताचा असल्याचे सांगत नागरिकांचा पैसा वाचणार असून चांगले आरोग्य राहण्यास मदत होईल, असे आ. चव्हाण म्हणाले.