दिवसाला ६ टक्के व्याजाला भुलले शेकडो कर्मचारी; दोन्ही अॅप पडले बंद, लाखों रुपये अडकले

By राम शिनगारे | Published: March 18, 2024 07:19 PM2024-03-18T19:19:36+5:302024-03-18T19:20:53+5:30

छप्पर फाड के... ५०० रुपयांचे ९० दिवसांत चक्क ९४,७३२ रुपये कमाईचे आमिष

fraud with hundreds of employees by promising interest at 6 percent per day; Both the apps were closed, lakhs of rupees were stuck | दिवसाला ६ टक्के व्याजाला भुलले शेकडो कर्मचारी; दोन्ही अॅप पडले बंद, लाखों रुपये अडकले

दिवसाला ६ टक्के व्याजाला भुलले शेकडो कर्मचारी; दोन्ही अॅप पडले बंद, लाखों रुपये अडकले

छत्रपती संभाजीनगर : 'एआरएनएक्स' व 'एलएमएएक्स' नावाच्या ॲपमध्ये ५०० रुपयांची गुतवणूक केल्यानंतर त्याच दिवशी ३० रुपये, दुसऱ्या दिवशी ५६२, तिसऱ्या दिवशी ५९६ रुपये अशी ‘दिन दुगनी व रात चौगुणी’ वाढ मिळत होती. म्हणजेच प्रतिदिन प्रति शेकडा तब्बल ६ टक्के व्याज मिळत होते. या आमिषाला बळी पडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील १५० ते २०० कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली. दोन महिन्यांतच हे दोन्ही ॲप बंद पडले असून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली.

मागील १५ दिवसांपासून दाेन्ही ॲप सुरू होत नाहीत. बदनामीच्या भीतीपोटी तक्रार देण्यास कोणताही कर्मचारी पुढे येत नसल्याची माहिती विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने 'लोकमत'शी बोलताना दिली. टेलिग्राम या सोशल मीडियात 'एआरएनएक्स' व 'एलएमएएक्स' या दोन ॲपविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने 'एलएमएएक्स' (एलमॅक्स) या ॲपवर सुरुवातीला ५०० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने पाच व्यक्ती जोडल्यास जोडणाऱ्या व्यक्तीलाही प्रतिदिन ६०० रुपये मिळतील, असे टेलिग्राम सोशल मीडियातील ग्रुपवर नमूद होते. त्यानुसार विद्यापीठातील कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये काही दिवसांत हे ॲप तोंडोतोंडी झाले. अनेकांनी स्वत:सह पत्नीच्या मोबाइलमध्येही दोन्ही ॲप डाऊनलोड करीत गुंतवणूक केली. अनेकांनी नातेवाइकांनाही गुंतवणूक करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे एलमॅक्स ॲपमध्ये पाचशे, हजार, पाच हजार, दहा हजार या पटीत गुंतवणूक करता येत होती. 'एआरएनएक्स' ॲपवर मात्र ५ हजार रुपयांपासून पुढेच गुंतवणूक करण्याची मुभा होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एलमॅक्स ॲपचाच सर्वाधिक वापर झाल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.

एवढे मिळणार होते ९० दिवसांनी पैसे
गुंतवूणक केल्यानंतर ९० दिवसांनी किती पैसे मिळतील याचे चार्टही पुरविण्यात आले होते. ५०० रुपये गुंतवल्यास त्यात प्रत्येक दिवशी ६ टक्के वाढ होऊन ९० दिवसांनी ९४ हजार ७३२ रुपये, १ हजार रुपयांस १ लाख ८९ हजार ४६५ रुपये, २ हजार रुपयांस ३ लाख ७८ हजार ९२९ रुपये, ३ हजार रुपयांस ५ लाख ६८ हजार ३९४ रुपये, ५ हजार रुपयांस ९ लाख ४७ हजार ३२३ रुपये आणि १० हजार रुपयांस १८ लाख ९४ हजार ६४५ रुपये ९० दिवसांनी मिळणार असल्याचेही आमिष दाखविण्यात आले होते.

टेलिग्रामवर फसवणूकीचे मायाजाल
टेलिग्राम सारख्या सोशल मीडियात अशा पद्धतीने फसवणूक करणारे शेकडो प्रोग्राम आहेत. त्यात कुठे गुंंतवणूक केली जाते, त्याविषयी काहीही माहिती मिळत नाही. देश-विदेशात या फसवणुकीच्या लिंकचे कनेक्शन निघू शकते. त्यामुळे नागरिकांनी अशा पद्धतीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. फसवणूक झालेली असेल तर १९३० क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच, निर्भीडपणे सायबर पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन सायबरतज्ज्ञ तथा सहायक पोलिस निरीक्षक अमोल सातोदकर यांनी केले.

भूलथापांना बळी पडू नका
नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या भूलथापांना बळी पडू नये. आपण कोठेही गुंतवणूक करणार असाल तर संबंधित संस्था, फर्म ही नोंदणीकृत आहे का, याची माहिती घेऊनच केली पाहिजे.
- गजानन कल्याणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे, आयुक्तालय

Web Title: fraud with hundreds of employees by promising interest at 6 percent per day; Both the apps were closed, lakhs of rupees were stuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.