छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकन नागरिकांसोबत फ्रॉड; आउटबाउंड कॉल्सद्वारे उकळायचे पैसे!
By विकास राऊत | Updated: October 29, 2025 13:27 IST2025-10-29T13:24:09+5:302025-10-29T13:27:27+5:30
आउटबाऊंड कॉल्स करून चालविला फ्रॉड उद्योग; डेटा प्रोव्हायडर वेबसाईटवर कोण कारवाई करणार ?

छत्रपती संभाजीनगरातून अमेरिकन नागरिकांसोबत फ्रॉड; आउटबाउंड कॉल्सद्वारे उकळायचे पैसे!
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा एमआयडीसीत १९९० च्या दशकात स्थापन झालेल्या एसटीपीआयमध्ये आजघडीला ४० लहान-मोठे आयटीशी (माहिती तंत्रज्ञान) निगडित उद्योग आहेत. अतिशय लहान आयटी पार्क असलेल्या या उद्योग वसाहतीतील कॉल सेंटरमधून आंतरराष्ट्रीय सायबर क्राईम होण्यासारखी घटना मंगळवारी उघडकीस आल्याने उद्योगविश्व चर्चेने ढवळून निघाले. आउटबाऊंड कॉल्स (डेटा मिळवून परदेशी नागरिकांना कॉल करणे) करून आंतरराष्ट्रीय फ्रॉडचा उद्योग उभारण्यामागे देशातील अनेक राज्यांतील नेटवर्क, डेटा प्रोव्हायडर वेबसाईट्स, बोगस ॲप्स तयार करून देणाऱ्या यंत्रणेचा हात असल्याचे बोलले जात आहे.
आयटी पार्कमधील कॉल सेंटरची सुमारे २० तास चौकशी करून पोलिसांनी आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा पर्दाफाश केला. कोण-कोणत्या देशात फसवणूक केली आहे, त्याचा रेकॉर्ड तपासाअंती समोर येईल. वर्षभरापूर्वी देशातील विविध राज्यांमध्ये नेटवर्क असलेली टीम येथे आल्यानंतर त्यांनी आयटी पार्कमध्ये भाडेकरारावर घेतलेल्या कनेक्ट एन्टरप्रायजेस टी-७ एसटीपीआयमधून हा फसवणुकीचा उद्योग सुरू केला.
कॉल सेंटर्समधून कसे चालते काम?
कॉल सेंटर म्हणजे एखाद्या कंपनीचे ग्राहकांशी थेट संवाद ठेवणारे केंद्र. फ्रंटलाइन एजंट्स कस्टमर एक्झिक्युटिव्ह म्हणून नेमलेल्या मुली व मुले ग्राहकांशी बोलतात. प्रत्येक टीमला मार्गदर्शन करणारा अधिकारी कॉल क्वालिटी आणि वेळेचे पालन करून विश्लेषण करतो. नवीन कर्मचाऱ्यांना संवाद कौशल्य, उत्पादन माहिती आणि ग्राहक हाताळणीचे प्रशिक्षण दिले जाते. कॉल सेंटर्स बहुतेक २४ तास सुरू असतात, परंतु आयटीपार्कमधील कॉल सेंटर नाईट शिफ्टमध्ये चालविले जात असे. प्रत्येक कर्मचाऱ्याला दररोज ठरावीक कॉल हँडलिंग टार्गेट होते. संगणकावर सीआरएमसारखे सॉफ्टवेअर वापरून महागड्या गॅझेटनुसार हे काम केले जात असे.
सायबर एक्सपर्ट काय म्हणतात?
इंग्रजी भाषेत निपुण असलेल्या मुला-मुलींना वेतन व इन्सेन्टिव्ह देऊन असे फ्रॉड कॉल सेंटर उभे केले जातात. क्रेडिट कार्ड, लिंक्सवरून पेमेंट करायला सांगतात, अनेक ॲप्सची लिंक देऊन ते डाऊनलोड करण्यास सांगतात. स्क्रीन शेअरिंगची स्कीम देऊन लोन, कर, हप्त्यांमध्ये सवलत मिळेल, असे सांगतात. स्क्रीन शेअरिंग करताच ओटीपी दिसतो, तो कॉल सेंटरमधील टीम पाहून फायनान्शियल फ्रॉड करतात.
या कॉल सेंटर्सला डेटा प्रोव्हाइड करणाऱ्या साईट्स, कंपन्यांवरदेखील कारवाई अपेक्षित आहे. कारण या सर्व फसवणुकीची सुरुवात डेटापासूनच होते. आयटी पार्कमधील कॉल सेंटरवरील कर्मचाऱ्यांना आपण इतरांना फसवताेय, हे माहिती होते, त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई झाली तर अशा फसवणुकींना आळा बसेल.
- मयूर दिवटे, सायबर एक्सपर्ट