ऑनलाइन केवायसी दाखल करणे पडले महागात; घाटी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 11:57 IST2021-07-22T11:51:06+5:302021-07-22T11:57:05+5:30

Cyebr Crime : पैसे वळते करून घेण्याचा प्रकार हा पश्चिम बंगालमधून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Fraud of senior doctor at ghati hospital, who had to file online KYC; | ऑनलाइन केवायसी दाखल करणे पडले महागात; घाटी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक

ऑनलाइन केवायसी दाखल करणे पडले महागात; घाटी रुग्णालयातील ज्येष्ठ डॉक्टरची ३ लाखांची फसवणूक

ठळक मुद्देपश्चिम बंगालमधून आलेल्या मेसेजमुळे ३ लाख रुपये गेले बँक आकाऊंटमधून तीन वेळा ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतले.

औरंगाबाद : ‘तुमच्या मोबाइलमधील सिमकार्ड बंद होणार आहे. तुम्ही तत्काळ केवायसी फाॅर्मची १० रुपये रक्कम ‘टीम व्हिवअर क्विकसपोर्ट’ या ॲपवर भरा’, असा मेसेज मोबाइलवर आला. त्यानंतर सिमकार्ड बंद पडेल, या भीतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) जनऔषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मोहन डोईबळे यांनी ॲप डाऊनलोड करून ‘केवायसी’ही अपडेट केले. त्यानंंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून सलग तीन वेळा ९९ हजार ९९९ रुपये असे एकूण ३ लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

घाटीतील ज्येष्ठ डॉक्टर डोईबळे यांनी आपली ३ लाख ७ रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार मंगळवारी जवाहनगर ठाण्यात दिली. त्यानुसार रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला. ६ जुलै रोजी डॉ. डोईबळे यांना पश्चिम बंगालमधून एक मेसेज आला. या मेसेजमध्ये आपले मोबाइलमधील सिमकार्ड बंद होणार आहे. ‘केवायसी’ अपडेट करावी लागेल. त्यानंतर आपले सिमकार्ड सुरू राहील. यासाठी मेसेजमध्ये लिंक दिलेले ‘टीम व्हिवअर क्विकसपोर्ट’ हे ॲप डाऊनलोड करावे. त्यात ‘केवायसी’ दाखल करण्यासाठी ऑप्शन दिलेले असतील. त्याप्रमाणे कागदपत्रे दाखल करावीत, असेही मेसेजमध्ये सांगितले होते. डॉ. डोईबळे यांनी सिमकार्ड बंद झाल्यानंतर ते सुरू करण्यासाठी वेळ वाया जाईल. त्यापेक्षा मेसेजमध्ये लिंक दिलेेले ॲप डाऊनलोड करण्याला प्राधान्य दिले. ॲप डाऊनलोड करून त्यावर ‘केवायसी’साठी लागणारी कागदपत्रे अपलोड केली. तसेच ‘केवायसी’ अपलोड करण्यासाठी लागणारे १० रुपयांचे शुल्क गारखेडा परिसरातील जय विश्वभारती कॉलनी येथील एसबीआयच्या बँकेतील खात्यातून ऑनलाइन भरले.

समोरील सायबर गुन्हेगारांनी १० रुपये ऑनलाइन दिल्याच्या रेकॉर्डवरून थोड्या वेळाने त्यांच्या बँक आकाऊंटमधून तीन वेळा ९९ हजार ९९९ रुपये काढून घेतले. या प्रकारे डॉ. डाेईबळे यांच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ७ रुपये दुसऱ्या खात्यात वळते झाले. पैसे वळते झाल्याचा मेसेज आल्यानंतर डॉ. डोईबळे यांनी बँकेत चौकशी करून अर्ज दाखल केला. यानंतर हे पैसे पश्चिम बंगालमधून वळते झाल्याचे तपासात पुढे आले. या घटनेनंतर १२ दिवसांनी त्यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल दिली. त्यानुसार आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील हे करीत आहेत.

तपासात अनेक अडचणी

पैसे वळते करून घेण्याचा प्रकार हा पश्चिम बंगालमधून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तेथील आरोपींना शोधून काढण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. तरीही पोलीस गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार वाढले आहेत. या आर्थिक फसवणुकीला साक्षर नागरिकच जास्त बळी पडत आहेत. त्यामुळे कोणत्याही मेसेज, लिंकला रिप्लाय देऊ नका, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले आहे.

Web Title: Fraud of senior doctor at ghati hospital, who had to file online KYC;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.