मताधिक्याची शिवसेनेची परंपरा कायम
By Admin | Updated: May 18, 2014 00:27 IST2014-05-18T00:22:32+5:302014-05-18T00:27:13+5:30
लोकसभा निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघातून आघाडीला भरपूर मताधिक्य राहिल, असे चित्र रंगवल्या जात होते.

मताधिक्याची शिवसेनेची परंपरा कायम
लोकसभा निवडणुकीत वसमत विधानसभा मतदार संघातून आघाडीला भरपूर मताधिक्य राहिल, असे चित्र रंगवल्या जात होते. तालुक्यातील झाडून सर्व नेते शिवसेनेला पाडण्यासाठी सज्ज झाले असल्याचे चित्र निवडणुकीपर्यंतचे होते. मात्र निकालानंतर या विधानसभा मतदार संघात पुन्हा शिवसेनेलाच मताधिक्य मिळाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून या निकालाने तालुक्यातील राजकीय गणित गुंतागुंतीचे होवून बसल्याचे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसनेने खा. सुभाष वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी दिल्याने वसमत तालुक्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीचा सूर काढण्यास सुरू केली होती. शिवसेनेचे माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व खा. सुभाष वानखेडे यांच्यातील विळ्या भोपळ्याचे सख्य सर्वश्रूतच होते. त्यामुळे मुंदडा गटाकडून वानखेडेंच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्यागेली होती. वानखेडेच्या प्रचाराकडे शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते उतरत नसल्याने वानखेडेच्या प्रचाराचा टेंम्पो अखेरपर्यंत तयारच झाला नव्हता. डॉ. मुंदडाची नाराजी वानखेडेला भोवणार हेच चित्र सुरुवातीपासून होते. त्यामुळे वानखेडेची बाजू कमजोर दिसत होती. वसमत तालुक्यात मतदारांनी वानखेडेंना नाही तर मोदींना मतदान केल्याचे निकालाने स्पष्ट केले. मोदींची लाट असतानाही शिवसेनेच्या काही पदाधिकार्यांनी शिवसेनेची मते आघाडीकडे वळवण्यात यश मिळवले. विशेषत: शहरातील शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातही आघाडीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळाल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळाले आणि या प्रकारामुळेच वानखेडेंना निसटत्या पराभवाचे तोंड पहावे लागले. डॉ. मुंदडाची नाराजी वानखेडेला भोवाल्याचीच प्रतिक्रिया सर्व सामान्यांतून व्यक्त होत आहे. पराभव झाला तरी वानखेडेंनी वसमत विधानसभा मतदारसंघात ९ हजार ९१ आघाडी घेवून सर्वच राजकीय नेत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेते कोणाकडेही गेले तरी मतदार आपल्या जागी कायमच असतात. हा धडाही या निकालाने पहावयास मिळाला. लोकसभा निकालाने वसमत विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणित पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचे राजकीय भवितव्य काय असेल? हा प्रश्नही या निकालाने उभा राहिला आहे. सर्व शक्ती पणाला लावून व विरोधकही सोबत असताना ग्रामीण भागात शिवसेनेलाच आघाडी मिळाल्याने आ. जयप्रकाश दांडेगावकरांनाही हा धक्का समजला जात आहे. लोकसभेत चाललेले मराठा कार्ड पाहता विधानसभेत एखादा मराठा चेहरा समोर आला तर पुन्हा एकदा काटे की टक्कर पहावयास मिळू शकते. दोन्ही जयप्रकाशांसाठी समाधानाची बाजू अशी की, तालुक्यात तिसरा कोणी प्रबळ संभाव्य उमेदवार तयार नाही. त्यामुळे ते निर्धास्त असतात; परंतु लोकसभेच्या निकालाने मतदार राजा कोणालाही डोक्यावर घेवू शकतो. हा संदेश दिल्याने दोन्ही जयप्रकाश यांच्या चिंता वाढू शकतात.