‘सुपरस्पेशालिटी’च्या इमारतीला हस्तांतरणापूर्वीच जागोजागी ‘फ्रॅक्चर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:07 IST2020-12-30T04:07:17+5:302020-12-30T04:07:17+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून घाटीत उभ्या राहिलेल्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकच्या भव्यदिव्य इमारतीचे ...

‘सुपरस्पेशालिटी’च्या इमारतीला हस्तांतरणापूर्वीच जागोजागी ‘फ्रॅक्चर’
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या १५० कोटी रुपयांच्या निधीतून घाटीत उभ्या राहिलेल्या सुपरस्पेशालिटी ब्लॉकच्या भव्यदिव्य इमारतीचे ३१ डिसेंबरपूर्वी घाटीला हस्तांतर करण्याची तयारी केली जात आहे. मात्र, या भव्य इमारतीला जागोजागी भेगा पडल्या आहेत. शिवाय इतर अनेक त्रुटींमुळे हस्तांतरापूर्वीच इमारत ‘फ्रॅक्चर’ झाली आहे.
घाटीत २५० खाटांचे सुपरस्पेशालिटीची इमारत केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील हेल्थ सर्व्हिसेस कन्सलटन्सी कार्पोरेशनने (एचएससीसी) ३१ डिसेंबरपूर्वी घाटी प्रशासनास हस्तांतरित करावी. तत्पूर्वी इमारतीतील सर्व सोयीसुविधा पूर्ण करून द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. या इमारतीचे काम २०१६ मध्ये सुरू झाले होते. या इमारतीचे कामकाज डिसेंबर २०१७ अखेर पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु २०२० वर्ष उजाडेपर्यंत अनेक कामे प्रलंबित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि या इमारतीमधील प्रलंबित कामे पूर्ण करण्यात आली. याठिकाणी कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहे. परंतु इमारतीमधील त्रुटी एका कोरोना रुग्णाच्या आत्महत्येच्या घटनेवरून समोर आल्या. येथील खिडक्यांना लोखंडी ग्रील, जाळीच लावण्यात आल्या नव्हत्या. या घटनेनंतर लोखंडी ग्रील बसविण्यात आल्या.
ही इमारत आता घाटीला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु इमारतीच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या त्रुटींची पूर्तता झाल्यानंतरच इमारतीचे हस्तांतर होणे गरजेचे आहे.
या आहेत काही त्रुटी
इमारतीच्या भिंतींना जागोजागी भेगा पडल्या आहेत. त्यावर वरवर दुरुस्ती करण्यात आली आहे. इमारतीच्या टेरेसला योग्य उतार नाही. त्यामुळे पावसाचे पाणी साचून गळती होण्याची स्थिती. काही ठिकाणी भितींना बसविण्यात आलेल्या फरशा निखळलेल्या आहे. काही ठिकाणी प्लॅस्टर केलेले नाही. स्वच्छतागृहातही त्रुटी असल्याचे समोर आले आहे.
त्रुटी दूर झाल्यानंतर हस्तांतर
सार्वजनिक बांधकाम विभाग, एचएससीसी आणि घाटी यांनी इमारतीची पाहणी केली आहे. काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्याची दुरुस्ती करण्याची सूचना करण्यात आली आहे. त्या दूर झाल्यानंतरच इमारतीचे हस्तांतर केले जाईल.
- डॉ. सुधीर चौधरी, विशेष कार्य. अधिकारी, सुपरस्पेशालिटी ब्लॉक
फोटो ओळ..
सुपरस्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीला अशाप्रकारे भेगा पडल्या आहेत.
सुपरस्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीतील त्रुटींची पाहणी करताना घाटी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी.