दुरंगी लढत होणार चौरंगी
By Admin | Updated: September 26, 2014 01:19 IST2014-09-26T00:56:14+5:302014-09-26T01:19:15+5:30
जालना : महायुतीपाठोपाठ काँग्रेस आघाडीसुद्धा संपुष्टात आल्याने या जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावरच महायुती

दुरंगी लढत होणार चौरंगी
जालना : महायुतीपाठोपाठ काँग्रेस आघाडीसुद्धा संपुष्टात आल्याने या जिल्ह्यातील मातब्बर पुढाऱ्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावरच महायुती व काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा सन्मानजनक समझोता होईल, पाठोपाठ यादीसुद्धा जाहीर होईल, असे अपेक्षित होते. त्यामुळेच गुरुवारी सकाळपासूनच मातब्बर पुढाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते मुंबई, दिल्लीतील घडामोडींकडे तासांगणिक लक्ष ठेवून होते. शुक्रवारी युती तुटल्याचे वृत्त धडकल्यानंतर शिवसेना-भाजपाच्या मातब्बर पुढाऱ्यांत प्रचंड अस्वस्थता पसरली. सर्वसामान्य कार्यकर्तेही हापकून गेले. तर महायुतीपाठोपाठ सायंकाळी आघाडीही तुटल्याचे वृत्त आल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीतील मातब्बर पुढाऱ्यांचे अक्षरश: अवसान गळाले. तर कार्यकर्ते चक्रावून गेले.
महायुती व आघाडीतील ऋणानुबंध संपुष्टात आल्याने या जिल्ह्यातील पाचही मतदार संघातील राजकीय समिकरणे पूर्णत: बदलणार आहेत. विशेषत: दुरंगी लढतीचे चित्र आता चौरंगी होणार आहे. निवडणूक रिंगणात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व भाजपचे उमेदवार उभे राहणार हे स्पष्ट आहे. म्हणजेच समविचारी पक्षांच्या मतांची मोठी विभागणी अटळ आहे. त्यामुळेच संभाव्य मातब्बर उमेदवार अक्षरश: हादरून गेले आहेत. चौरंगी लढतीचे चित्र परवडणारे नाही. विशेषत: काही मतदार संघात या प्रमुख चार पक्षांबरोबरच मनसे, बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष तसेच अन्य घटक पक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्यामुळेच लढत बहुरंगी होईल, असेही चित्र आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जालन्यातून काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी तर शिवसेनेविरोधात भाजप उमेदवार रिंगणात उतरेल. बदनापुरातून शिवसेनेविरोधात भाजप तर राष्ट्रवादीच्या विरोधात आता काँग्रेसचा उमेदवार रिंगणात येईल. पालकमंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगीतून काँग्रेसही आव्हान उभे करेल. तर शिवसेना उमेदवाराबरोबर भाजपही टक्कर देईल, असे चित्र दिसणार आहे. परतूरमधून भाजप विरोधात शिवसेनेने नेहमीच रान उठविले आता ते अधिकृतपणे एकमेकांसमोर उभे राहणार असून, काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आ. सुरेश जेथलिया यांना आता राष्ट्रवादीचेही आव्हान पेलावे लागणार आहे. भोकरदनमधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना चिरंजीवांना निवडून आणण्यासाठी आता शिवसेनेशीही झगडावे लागणार आहे. तर विद्यमान आ. चंद्रकांत दानवे यांना मित्रपक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसचे आव्हान उभे राहणार आहे.