चौघांचे सदस्यत्व धोक्यात
By Admin | Updated: June 22, 2014 01:02 IST2014-06-22T01:02:02+5:302014-06-22T01:02:46+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने दोन नगरपंचायती आणि एक नगर परिषद अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

चौघांचे सदस्यत्व धोक्यात
सुनील कच्छवे , औरंगाबाद
जिल्ह्यात नव्याने दोन नगरपंचायती आणि एक नगर परिषद अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातून निवडून गेलेल्या चार जणांचे जिल्हा परिषद सदस्यत्व धोक्यात आले आहे. यामध्ये शिवसेनेच्या तीन आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे.
औरंगाबाद शहराला लागून असलेल्या सातारा आणि देवळाई या दोन गावांच्या सुनियोजित विकासासाठी नगर परिषद स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला आहे. या ठिकाणी दोन्ही गावांची मिळून एक संयुक्त नगर परिषद स्थापन केली जाणार आहे. याशिवाय फुलंब्री आणि सोयगाव या तालुक्यांच्या ठिकाणीही नगरपंचायती स्थापन करण्यात येणार आहेत.
सातारा- देवळाई संयुक्त नगर परिषद तसेच सोयगाव आणि फुलंब्री नगरपंचायतींच्या स्थापनेची कार्यवाही सुरू झाली आहे. सातारा- देवळाई नगर परिषदेसाठी आक्षेप मागविण्याची कार्यवाही पूर्ण होऊन आता त्यावर २७ जून रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे, तर सोयगाव आणि फुलंब्री या दोन नगरपंचायतींच्या स्थापनेसंदर्भात आक्षेप मागविण्यात आले आहेत. हे आक्षेप दाखल करण्याची मुदत ३० जून रोजी संपत आहे. त्यानंतर प्राप्त आक्षेपांवरही सुनावणी घेण्यात येईल. सुनावणीनंतर जिल्हा प्रशासनाकडून अहवाल राज्य सरकारला पाठविला जाईल.
हा अहवाल जाताच अधिसूचना प्रसिद्ध होऊन वरील ठिकाणी अनुक्रमे नगर परिषद आणि नगरपंचायती अस्तित्वात येणार आहेत. त्यामुळे सध्या ग्रामीण असलेले हे क्षेत्र नागरी होणार आहे. परिणामी, या क्षेत्रातून जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे सदस्यत्व आपोआपच रद्द ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत एकूण ६० सदस्य असून त्यातील चार सदस्य सोयगाव, फुलंब्री, सातारा आणि देवळाई या गटांतील आहेत. नागरी क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर हे गटही आपोआपच रद्द होणार आहेत.
सत्ता समीकरणावर परिणाम नाही
जि.प.त सध्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- मनसे आघाडीची सत्ता आहे. ज्या चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता आहे त्यात काँग्रेसचा एक आणि शिवसेनेचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडीवर त्याचा परिणाम होणार नाही. मात्र, विरोधी पक्ष असलेली शिवसेना जिल्हा परिषदेत आणखी कमकुमवत होणार आहे.
यांचे सदस्यत्व धोक्यात
प्रभाकर काळे, काँग्रेस (सोयगाव)
नंदाबाई ठोंबरे, शिवसेना (फुलंब्री)
योगिता बाहुले, शिवसेना (सातारा)
अनिता राठोड, शिवसेना (देवळाई)
अधिनियम काय सांगतो
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम २५७ च्या भाग २ मध्ये सदस्यत्व रद्द होण्यासंबंधीचा उल्लेख आहे. एखादा गट किंवा गण नागरी क्षेत्रात गेल्यास तेथील सदस्यत्व रिक्त होईल, असे यात म्हटले आहे.
सध्याचे संख्याबळ
शिवसेना18
भाजपा6
काँग्रेस15
राष्ट्रवादी काँग्रेस10
मनसे 8
इतर 3
एकूण 60