राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब ‘निषेधासन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 23:21 IST2018-10-31T23:21:06+5:302018-10-31T23:21:43+5:30
शहर-जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी गांधी पुतळा, शहागंज येथे निषेधासन आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला

राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनी युवक काँग्रेसचे औरंगाबादेत अजबगजब ‘निषेधासन’
औरंगाबाद : शहर-जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज सकाळी गांधी पुतळा, शहागंज येथे निषेधासन आंदोलन करून देवेंद्र फडणवीस सरकारचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सत्तेत येण्यापूर्वी युवक महिला, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी या सर्वच समाजघटकांना भावनिक आमिष दाखवून भाजपने फसविले आहे. आश्वासनपूर्ती न करता ‘तो चुनावी जुमला होता’ असे भाजपचे वरिष्ठ नेते सांगतात. ही क्रूर चेष्टा होय’ असा आरोप तांबे यांनी यावेळी केला.
जलयुक्त शिवार योजना फसली आहे. महागाईवर नियंत्रण मिळविण्यात सरकारला अपयश आले आहे. देशाच्या परकीय गंगाजळीत घट झाली आहे. शेतीमालाला हमीभाव नाही. नोटबंदी व जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. नोकऱ्या देतो म्हणून बेरोजगारांना फसविण्यात आले. अशा एक ना अनेक अपयशांकडे या आंदोलनाद्वारे लक्ष वेधण्यात आले.
सरकारचे मंत्री, पदाधिकारी व प्रवक्ते नुसतेच वाचाळवीर झाले आहेत. ते शेतकºयांनाही शिव्या देतात. देशाचे चौकीदार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राफेलप्रकरणी मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप तांबे यांनी केला. रस्त्यावरच विविध आसने करून व सरकारच्या विरोधात नारे देरून करण्यात आलेल्या या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्याचे प्रभारी मुक्तद्दीर देशमुख, प्रदेश प्रतिनिधी डॉ.जितेंद्र देहाडे, प्रदेश महासचिव आदित्य पाटील, आमेर अब्दुल सलीम, प्रदेश सचिव अखिल पटेल, प्रभाकर मुठ्ठे पाटील, शहर उपाध्यक्ष नीलेश अंबेवाडीकर, मोहसीन खान, गौरव जैस्वाल, मुजाहेद पटेल, नासीर नजीर खान, शेख अथर, खालेद पठाण, सचिन शिरसाठ, मोईन इनामदार, अश्फाक पठाण, उमर पठाण, शेख शफिक सरकार, इरफान इब्राहिम पठाण, नदीम सौदागर, सलमान पटेल, नदीम पटेल, सलीम खान, इम्रान पठाण, इरफान खान, शोएब अब्दुल्ला, शेख अजहर, जावेद देशमुख, शेख सलीम, पठाण जावीद, आमेर खान, अॅड.सलीम शेख, सय्यद जुबेर, इंजिनिअर इफ्तेखार, साजिद कुरेशी आदींसह मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नरेंद्र मोदी हे जगात जाऊन योगाबद्दल सांगत असतात. त्याच योगाच्या भाषेत युवक काँग्रेसने हा निषेध नोंदविला. या अभिनव आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले.