गौताळा अभयारण्यातील मौल्यवान खडक चोरीप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:19+5:302021-02-05T04:09:19+5:30
चोरीप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल कन्नड : गौताळा-औट्राम वन्यजीव अभयारण्यात अवैधरित्या उत्खनन करून मौल्यवान खडक व वनउपज चोरल्याची गुप्त ...

गौताळा अभयारण्यातील मौल्यवान खडक चोरीप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल
चोरीप्रकरणी चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल
कन्नड : गौताळा-औट्राम वन्यजीव अभयारण्यात अवैधरित्या उत्खनन करून मौल्यवान खडक व वनउपज चोरल्याची गुप्त माहिती वन विभागास मिळताच संशयित आरोपींच्या घरी शनिवारी (दि.२३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास धाडीची कारवाई करण्यात आली. वन्यजीव व प्रादेशिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपीच्या घरातून नॉट्रोलाईट, अपोपेलाईट प्रकारातील मौल्यवान खडक, सफेद मुसळी व डिंक असा वनउपज जप्त करण्यात आला. याप्रकरणी काले खॉ सरदार खाँ, शरीफ सरदार खाँ पठाण, कालू खाँ पठाण व महेबुब खाँ पठाण (सर्व रा. गराडा. ता. कन्नड) या चार जणांविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) आर. बी. शेळके हे करीत आहेत. चारही आरोपी अद्याप फरार आहेत.
गौताळा अभयारण्यास लागून असलेल्या गराडा गावातील या चारही आरोपींच्या घरातून मौल्यवान दगड ३०१ किलो, सफेद मुसळी ५.१५ किलो व धामोडी डिंक ६.८४ किलो असा मुद्देमाल व टिकाव, कुदळ, छन्नी, टॉमी, करवत इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. सदर आरोपी मात्र फरार असून शोधमोहीम सुरू आहे. औरंगाबाद वन्यजीव विभागाचे विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली असून यावेळी पैठणचे सहाय्यक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे, कन्नड वन्यजीव परिक्षेत्राचे अधिकारी आर. बी. शेळके, नागद सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी आनंद गायके यांचा सहभाग होता.
१९२६ वर करा संपर्क
नंदुरबारचे सहायक वन संरक्षक धनंजय पवार, जळगावचे मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, जामनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी समाधान पाटील यांनी सहकार्य केले. वन्यप्राणी किंवा इतर मौल्यवान वनउपजा संदर्भात कुठलाही वन गुन्हा निदर्शनास आल्यास तत्काळ नागरिकांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क साधवा असे आवाहन वन्यजीव विभाग औरंगाबाद यांनी केले आहे.
फोटो :