घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग

By संतोष हिरेमठ | Updated: January 14, 2025 19:30 IST2025-01-14T19:29:31+5:302025-01-14T19:30:07+5:30

अग्निशामक यंत्रणेचे काम अडकले ८० टक्क्यांवर

Four fires in four years at Ghati Hospital, dangerous wiring everywhere | घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग

घाटी रुग्णालयात चार वर्षांमध्ये चार वेळा आग, जागोजागी धोकादायक वायरिंग

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड ठरणाऱ्या घाटी रुग्णालयात गेल्या ४ वर्षांत ४ वेळा विद्युत यंत्रणेमुळे शाॅर्टसर्किट, स्पार्किंग आणि आगीच्या ४ घटना घडल्या. सुदैवाने प्रत्येक वेळी मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. मात्र, घाटीत जागोजागी अजूनही धोकादायक अवस्थेत विद्युत वायरिंग आणि विद्युत यंत्रणा पाहायला मिळते. शिवाय फायर फायटिंग यंत्रणेचे कामही ८० टक्क्यांवर अडकले आहे.

घाटी रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहात (ओ.टी.) सिझेरियन प्रसूती सुरू असतानाच ऑक्सिजन सिस्टिमच्या अलार्म पॅनलला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. सुदैवाने परिचारिका आणि डाॅक्टरांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घाटी रुग्णालयाचा मुख्य कणा म्हणून सर्जिकल इमारतीची ओळख आहे. आजघडीला या इमारतीत जागोजागी विद्युत वायरिंग, डीपी, विद्युत यंत्रणेच्या बाॅक्सची अवस्था चिंताजनक आहे.

अग्निशमन सिलिंडरवरच मदार
घाटीत फायर फायटिंग सिस्टिम कामासाठी २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. आजघडीला हे काम ८० टक्के पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यामुळे आजघडीला आगीसारख्या प्रसंगी अग्निशमन सिलिंडरवर मदार आहे.

घाटीतील यापूर्वीच्या घटना...
- घाटीतील किचनमध्ये १७ ऑक्टोबर २०२० रोजी गुळाच्या भेलीच्या खोक्याला आग लागली होती.
- २२ जून २०२१ रोजी घाटीतील प्रसूती कक्षाच्या परिसरातील जुन्या ‘एनआयसीयू’च्या प्रवेशद्वाराजवळच इलेक्ट्रिक बोर्डमध्ये स्पार्किंग होऊन आग लागली होती. सुदैवाने या घटनेत १८ शिशू सुखरूप बचावले.
- घाटीतील ‘आयसीसीयू’मध्ये असलेल्या एका इलेक्ट्रिक बेडला २९ ऑगस्ट २०२३ रोजी मध्यरात्री आग लागली होती.
- २१ एप्रिल २०२४ रोजी घाटीतील अपघात विभागावरील नर्सिंग होमच्या रूममला शाॅर्टसर्किटने आग लागली होती.

टप्प्याटप्प्यात दुरुस्ती
विद्युतीकरणाचे काम हे टप्प्याटप्प्यात करण्यात येत आहे. घाटीतील फायर फायटिंग सिस्टिमचे कामही अंतिम टप्प्यात आहे. आजघडीला ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
- डाॅ. शिवाजी सुक्रे, अधिष्ठाता

Web Title: Four fires in four years at Ghati Hospital, dangerous wiring everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.