अधिकाऱ्यासह चार कर्मचारी गैरहजर
By Admin | Updated: July 14, 2015 00:50 IST2015-07-14T00:45:36+5:302015-07-14T00:50:32+5:30
जालना : काही सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाच्या वतीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ३ कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला.

अधिकाऱ्यासह चार कर्मचारी गैरहजर
जालना : काही सामाजिक संघटनांनी केलेल्या तक्रारीनंतर तहसील कार्यालयाच्या वतीने सोमवारी येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक ३ कार्यालयाचा पंचनामा करण्यात आला. यात उपविभागीय अभियंत्यांसह अन्य चार कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. दरम्यान, या चारपैकी एक महिला कर्मचारी वैद्यकीय रजेवर असल्याचे नंतर निष्पन्न झाले.
या कार्यालयात अधिकारी, कर्मचारी गैरहजर राहतात, अशी लेखी तक्रार मराठा महासंघाचे अरविंद देशमुख, अशोक पडूळ, महाराणा ब्रिगेडचे धनसिंह सूर्यवंशी, जनता व पोलिस समितीचे एस.पी. झंवर, लहुजी शक्ती सेनेचे सचिन क्षीरसागर यांनी तहसीलदार रेवननाथ लबडे यांच्याकडे केली होती. या तक्रारीवरून तहसीलदार लबडे, नायब तहसीलदार संदीप ढाकणे यांनी या कार्यालयाचा पंचनामा करण्याचे निर्देश मंडळ अधिकारी बी.डी. भावले व तलाठी सय्यद खालेद यांना दिले होते.
त्यानुसार सकाळी ११.४५ वाजता या महसूल पथकाने कार्यालयाची तपासणी केली.
त्यावेळी उपविभागीय अभियंता ए.एस. शेख, वरिष्ठ लिपिक के.व्ही. गायकवाड, कनिष्ठ लिपिक ए.पी. चव्हाण, लिपिक छाया कुहिरे हे गैरहजर असल्याचे आढळून आले. कुहिरे यांचे अभिलेखे तपासणीअंती त्या वैद्यकीय रजेवर असल्याचे आढळून आले. (प्रतिनिधी)
याबाबत तहसीलदार रेवननाथ लबडे म्हणाले, काही सामाजिक संघटनांनी सदर कार्यालयातील अधिकारी सतत गैरहजर राहत असल्याची तक्रार केली होती. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पथकास आम्ही पंचनामा करण्याचे निर्देश दिले होते. यासंबंधीचा पंचनामा करण्यात आला असून मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे तहसीलदार लबडे यांनी सांगितले.