वाळूज महानगर : वडगाव कोल्हाटी-बजाजनगर परिसरात दहशत माजविणाऱ्या कुख्यात गुंड विशाल उर्फ मड्या फाडे याचा खून करुन फरार झालेल्या चौघा आरोपींना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उद्योगनगरीत जेरबंद केले. हर्सुल कारागृहातून सुटका झाल्यानंतर विशाल हा सतत जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने त्याचा काटा काढल्याची कबुली अटकेतील आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
वडगाव-बजाजनगर परिसरात गुंडगिरी करुन दहशत पसरविणाऱ्या कुख्यात गुंड विशाल उर्फ मड्या फाटे (२६ रा.वडगाव) याचा आठवडाभरापूर्वी बजाजनगरात दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या खुनाच्या घटनेमुळे उद्योगनगरी चांगलीच हादरुन गेली होती. विशाल याचा खून केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित अवघ्या २४ तासाच्या आत प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन सोमनाथ प्रधान (२९), त्याचा लहान भाऊ अजय सोमनाथ प्रधान (२३) व आशिष लक्ष्मण काळे (३४, सर्व रा.वडगाव) यांना पाटोदा शिवारात जेरबंद करण्यात आले होते. मात्र या खून प्रकरणात सहभागी असलेले चार आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले होते. या फरार चौघा आरोपींच्या शोधासाठी एमआयडीसी वाळूज पोलिसांनी दोन पथक स्थापन करुन परिसरात त्यांचा शोध सुरु होता.
फरार चौघे आरोपी त्यांच्या नातेवाईकांच्या संपर्कात असल्याची माहिती बुधवारी (२६) रात्री पोलिसांंना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन आरोपी लपलेल्या ठिकाणाची माहिती जाणून घेतली. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथक स्थापन करुन मध्यरात्री ११.४५ वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसीतील कामगार चौकात सापळा रचून दीपक तुकाराम प्रधान (२९), राहुल पंढरीनाथ विटेकर (२९, दोघेही रा. वडगाव), किरण सुदाम वाघ (२८ रा. वडगाव), महेश हिरालाल शिगोटे (२८ रा. कमळापूर फाटा) या चौघांना ताब्यात घेतले.
जिवे मारण्याच्या धमक्यांमुळे विशालचा काटा काढलाविशाल हा सतत जिवे मारण्याच्या धमक्या देत असल्याने त्याचा काटा काढल्याची कबुली सचिन प्रधान व त्याच्या साथीदारांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सहा. फौजदार कय्युम पठाण, प्रकाश गायकवाड, विक्रम वाघ, नवाब शेख, दीपक मतलबे आदींनी पार पाडली. दरम्यान, चौघा आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.