साताऱ्याच्या खंडोबा मंदिराचा पाया खचू लागला
By Admin | Updated: December 29, 2014 01:08 IST2014-12-29T00:59:24+5:302014-12-29T01:08:51+5:30
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद औरंगाबादजवळील सातारा येथील हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांचे दगड ऊन, पाऊस, वाऱ्याने झिजले असून, त्यावरील नक्षीकाम गायब झाले आहे.

साताऱ्याच्या खंडोबा मंदिराचा पाया खचू लागला
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद
औरंगाबादजवळील सातारा येथील हेमाडपंती खंडोबा मंदिराच्या पायऱ्यांचे दगड ऊन, पाऊस, वाऱ्याने झिजले असून, त्यावरील नक्षीकाम गायब झाले आहे. मंदिराचा पायाच झिजून खचत असल्याने मोठा अनर्थ होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य पुरातत्व खात्याने अद्याप जीर्णोद्धारास परवानगी न दिल्यामुळे निधी मंजूर झालेला नाही. त्यामुळे हे काम रखडले आहे. मात्र, येत्या वर्षात निधी मिळून मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे आश्वासन खात्याचे स्थानिक अधिकारी देत आहेत.
मंदिराच्या समोरील पन्नास फूट उंचीच्या भिंतीला तडे गेल्याने त्या ठिकाणी वाहनतळ आणि भक्तांसाठी भक्तालय उभारण्याचे काम विश्वस्तांनी हाती घेतले आहे. परंतु पुरातन नक्षीकाम पूर्णत: खराब झाले असून, त्याची देखभाल न केल्यास मंदिराचा भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
१५० फूट उंचीच्या या मंदिरासमोर सतत तेवत राहणारी २३६ दिव्यांची दीपमाळ आहे. त्या दीपमाळेचे ६५ ते ७० दिवे शिल्लक असून, दगडही झिजले आहेत. या दगडातून झाडे उगवल्याने तो दगडही पडून मोठा अपघात होण्याची भीती आहे. मंदिरासाठी तीन प्रकारच्या दगडांचा वापर केला असून, तो दगड कोकण आणि राजस्थानातून आयात करण्यात आलेला आहे. त्यावर नक्षीकाम म्हणजे अस्सल कलाकारीचा नमुना आहे. गोपुरांंवर दशावताराच्या मूर्तीचे दर्शन होते. नुकताच या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. मंदिर राज्य पुरातत्व खात्याकडे हस्तांतरित केलेले आहे; परंतु अद्याप कोणतीही सेवा-सुविधा पुरविली जात नाही.