अंबाजोगाईच्या मातीत शेतकरी संघटनेची पायाभरणी
By Admin | Updated: December 14, 2015 23:56 IST2015-12-14T23:52:33+5:302015-12-14T23:56:59+5:30
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव

अंबाजोगाईच्या मातीत शेतकरी संघटनेची पायाभरणी
अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई
स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघर्षाचे प्रमुख केंद्र असलेल्या अंबाजोगाईत शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी झाली. १९८२ साली झालेल्या ऊस आंदोलनात पानगाव येथील रमेश मुगे हे संघटनेच्या आंदोलनातील पहिले हुतात्मा ठरले. त्यानंतर अंबाजोगाईतील शिबिरात मोठ्या प्रमाणात विचारमंथन झाले व या विचारमंथनातून शेतकरी संघटना विचार व कार्यपद्धती या ऐतिहासिक ग्रंथाची निर्मिती झाली. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या निधनाने आठवणींना उजाळा मिळाला.
अंबाजोगाईत २२ सप्टेंबर १९८६ रोजी अखिल भारतीय ज्वारी परिषद तर २३ सप्टेंबर १९८६ रोजी शेतकरी विद्यार्थी संघटनेची निर्मिती झाली. अमर हबीब, श्रीरंग मोरे, यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय ज्वारी परिषद झाली होती. खोलेश्वर महाविद्यालयात शरद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य रा. गो. धाट यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी मेळावा झाला. शरद जोशी यांनी कालिदास आपेट व अॅड. सच्चिदानंद मोरे यांच्यावर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सोपविली होती. १९९६ साली ऊसावरील झोनबंदीचा कायदा संपविण्यासाठीचा हातोडा मोर्चा अंबासाखर कारखाना येथे झाला. या सर्व घटनांनी अंबाजोगाई हे शेतकरी संघटनेच्या विचारांची पायाभरणी करणारे प्रमुख केंद्र ठरले.
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई तालुक्यातील पानगाव येथे ऊसआंदोलन झाले. या आंदोलनात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे अडवली. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रमेश मुगे हा शेतकरी हुतात्मा ठरला.
श्रीरंगराव मोरे यांचे सहकारी दत्तू आपेट गुरुजी, अॅड. शिवाजीराव कराड, अॅड. कुंडलिक कराड, वसंतराव मोरे, अमर हबीब, नारायण पांडे, माजी सैनिक भगवानराव शिंदे, पंढरीनाथ यादव, केशव बडे, रामराव नाटकर, किसनराव बावणे, प्रा. केशव देशपांडे, प्रा. ए. बी. देशपांडे ही मंडळी पहिल्या फळीचे कार्यकर्ते म्हणून शेतकरी संघटनेचे सच्चे पाईक बनले तर शरद जोशींच्या सततच्या संपर्कामुळे अंबाजोगाई तालुक्यात अंकुशराव काळदाते, संभाजी रेड्डी, शिवाजीराव देशमुख, अनुरथ मामडगे, अशोक गुणाले, वसंत शिंदे, उत्तमराव तट, परमेश्वर पिसुरे, कालिदास आपेट, राजाभाऊ गौरशेटे, अच्युत गंगणे, असे अनेक कार्यकर्ते शेतकरी संघटनेत मोठ्या हिरीरीने सहभागी झाले. परिणामी अंबाजोगाईला लाभलेला संघर्ष व चळवळीचा ऐतिहासिक वारसा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पुन्हा अखंडित सुरू राहिला. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी गिरवली, धानोरा, जवळगाव, वाला, चनई, मोरेवाडी, बोरीसावरगाव आदी गावे पिंजून काढली.
शरद जोशी हे राज्यसभेचे सदस्य झाल्यानंतर त्यांनी पहिला खासदार निधी पानगावला दिला. ५० लक्ष रुपयांपैकी २५ लक्ष रुपयांतून आंदोलनात हुतात्मा ठरलेल्या रमेश मुगे यांच्या नावाने ग्रंथालय व स्मारक उभारले.
पहिला ‘ज्ञानश्री पुरस्कार’ शरद जोशी यांना
४शेतकरी संघटनेचे नेते श्रीरंग मोरे यांनी शेतकरी चळवळीत काम करणाऱ्यांना ज्ञानश्री पुरस्कार प्रतिवर्षी देण्याचे जाहीर केले. पहिल्या पुरस्काराचे मानकरी शरद जोशी ठरले. सन १९१२ मध्ये रोख १ लक्ष रुपये, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन त्यांना अंबाजोगाईत सन्मानित करण्यात आले होते.