मराठवाड्यावर कायम अन्यायच

By Admin | Updated: March 21, 2016 00:16 IST2016-03-21T00:02:23+5:302016-03-21T00:16:47+5:30

जालना : पाणी असो अथवा इतर विकासाची बाब प्रत्येक वेळी मराठवाड्यावर अन्यायच होत आला आहे. आता त्यासाठी स्वतंत्र मराठवाडा तसेच न्याय्य मागण्यांसाठी र

Forever injustice to Marathwada | मराठवाड्यावर कायम अन्यायच

मराठवाड्यावर कायम अन्यायच


जालना : पाणी असो अथवा इतर विकासाची बाब प्रत्येक वेळी मराठवाड्यावर अन्यायच होत आला आहे. आता त्यासाठी स्वतंत्र मराठवाडा तसेच न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असे मत मराठवाडा विकास परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांनी व्यक्त केले.
मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. व्यासपीठावर महअधिवक्ता श्रीहरी अणे, प्रा.बाबा उगले, अ‍ॅड. किशोर राऊत, ज्येष्ठ पत्रकार अंकुशराव देशमुख, गोकूळ स्वामी आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आहे, शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाल्याचे सांगून शेतकरी आत्महत्या हे राष्ट्रीय संकट मानून त्यासाठी पक्षभेद बाजूला ठेवून लढा देण्याची गरज निर्माण झाली आहे. मराठवाड्याला नाशिक, नगरमुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. तेथील राजकीय पदाधिकारी असो अथवा नागरिक पाणी म्हटले की रस्त्यावर येतात. मराठवाड्याला पाणी देण्यास त्यांचा कायम विरोध असतो. मराठवाड्याचे वाळवंटीकरण होत आहे. जालना ते जायकवाडी जलवाहिनीसाठी जनहित याचिका दाखल करण्यासाठी पुढाकार घेऊन जालन्याला पाणी मिळवून दिले. यासाठीही मोठा संघर्ष करावा लागला. गत चार वर्षांपासून मराठवाडा दुष्काळाचा भयावह सामना करत आहे. जालना शहराला महिनाआड पाणी मिळत होते. जालना शहराला जायकवाडी जलाशयातून पाणी मिळावे म्हणून जनहित याचिका दाखल केली. त्यानंतर २८७ कोटींची योजना कार्यान्वित होऊन पाणीपुरवठा सुरळीत झाला. नवीन सरकार सत्तेवर येऊन दोन वर्षे उलटली. दोन वर्षांत मराठवाड्यात कोणताही बदल झाला नाही. परिस्थिती जैसे थेच असल्याचे सांगून शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे देशमुख म्हणाले. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी कोठे जावे, असा सवाल देशमुख यांनी उपस्थित केला. मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी, मूलभूत गरजांसाठी जनतेने राजकीय पुढाऱ्यांची वाट न बघता संघर्षासाठी तयार रहावे असे आवाहन त्यांनी केले.
आज मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थतीमुळे दोन तृतीयांश जनतेने स्थलांतर केले आहे. शेतकरी आत्महत्या मोठा गंभीर प्रश्न बनला आहे. यासाठी पक्षभेद न आणता शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. ते आस्मानी संकट नव्हे मानवनिर्मित संकट आहे.
मराठवाड्याचे वाळवंट होत असून, ५०० फूट खोदूनही पाणी लागत नसल्याची चिंता देशमुख यांनी व्यक्त केली. नागपूर करारात मराठवाड्याचाही समावेश आहे. त्यामुळे जर वेगळा विदर्भ झाल्यास वेगळा मराठवाडाही व्हावा.
कार्यक्रमाचे आयोजक प्रा. बाबा उगले यांनी आपल्या भाषणातून मराठवाडा वेगळा झालाच पाहिजे त्यासाठी संघर्ष करणाच असा इशारा दिला. मराठवाड्याचा विकास खुंटलेला आहे. प्रत्येक गोष्टीत मराठवाड्याला डावलले जात असल्याची खंत व्यक्त केली. २०१४ अखेर १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. राजकीय नेते केवळ भावनिक आश्वासन देतात. मराठवाड्यातील न्याय हक्कासाठी न्याय मागण्यांसाठी जागृती होण्याची गरज निर्माण झाली आहे. नाशिक व नगर जिल्ह्यात मोठे ११ तर लहान ३४ धरणे आहेत. या प्रकल्पांतच सर्व पाणीसाठा आहे. मराठवाड्यात थेंबबर पाणी सोडण्यासाठी संघर्ष करावा लागतो ही शोकांतिका असल्याचे उगले म्हणाले. मात्र, आत्ता स्वस्थ बसणार नाही.
वेगळे मराठवाडा राज्य झालेच पाहिजे यासाठी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत संघर्षाची मशाल पेटविणार असल्याचे उगले यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले. यावेळी शेतकरी तसेच नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

Web Title: Forever injustice to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.