जलसंधारणासाठी लोकचळवळ

By Admin | Updated: May 12, 2016 00:36 IST2016-05-12T00:24:53+5:302016-05-12T00:36:53+5:30

उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे गावा-गावात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत

Folklore for water conservation | जलसंधारणासाठी लोकचळवळ

जलसंधारणासाठी लोकचळवळ


उस्मानाबाद : मागील तीन-चार वर्षांपासून पावसाचे प्रमाण घटल्यामुळे जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे गावा-गावात जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, याला लोकसहभागाचीही जोड मिळत असल्याने या उपक्रमाला आता चळवळीचे स्वरुप आले आहे. विविध संस्था, संघटनांसोबतच सर्वसामान्य नागरिकांकडून देखील यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक सहकार्य केले जात आहे. नोकरी, उद्योगधंद्यासाठी गाव सोडून गेलेले भूमिपूत्र देखील या कामासाठी आपापल्या परीने सहकार्य करीत असल्यामुळे या उपक्रमाला गती मिळाल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.
उस्मानाबाद: लोकसहभागाच्या माध्यमातून शहरातून वाहणाऱ्या भोगावती नदीचे पुनरूज्जीवन व खोलीकरण करण्याचा निर्णय आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, गुरुवार दि. १२ मे रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे आ. पाटील यांनी बैठकीत जाहिर केले.
मागील काही दिवसांपासून भोगावती नदीचे खोलीकरण व पुनरूज्जीवन करण्याची चर्चा सुरू आहे. या अनुषंगाने बुधवारी नगरपरिषदेमध्ये शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह सर्वपक्षीयांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्ष संपतराव डोके, माजी नगराध्यक्ष नंदूराजे निंबाळकर, नानासाहेब पाटील, मधुकर तावडे यांच्यासह डॉ. स्मिता शहापूरकर, श्रीकृष्ण भन्साळी, अमित शिंंदे, प्रकाश जगताप, धनंजय शिंगाडे, श्री. श्री. रविशंकरचे नितीन भोसले, पतंजली योग समितीचे नितीन तावडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष समियोद्दिन मशायक, अ‍ॅड. विशाल साखरे, आदिसह प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. या बैठकीत चर्चेपेक्षा कृतीवर भर देण्याचा निर्धार करण्यात आला. कामाला तातडीने सुरूवात करण्याच्या दृष्टीने आ. पाटील यांनी स्वत एक लाख रूपये देत असल्याचे घोषित केले. तसेच राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडून प्रत्येकी १० हजार रूपये या कामासाठी देण्याचेही जाहीर केले. यावेळी पतंजली परिवाराकडून १ लाख रूपये लोकवाटा देण्याची घोषणा नितीन तावडे यांनी केली. या पद्धतीने शहरातील कांही संस्था व नागरिकांनीही आपआपल्या परिने यात आर्थिक सहभाग नोंदविला. शहरातील नागरिकांनीही यात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात भोगावती नदीचे २ कि. मी. खोलीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. मधुकर तावडे यांच्या शेतापासून हे काम सुरू होणार असुन शिवसेना जिल्हा प्रमुख सुधिर पाटील यांच्या घरापर्यंतचा हा पहिला टप्पा आहे. शहरातील नदीचे काम हाती घेण्यापूर्वी गटारीचे पाणी नदीत न येण्याच्या दृष्टीने अगोदर उपाय योजना केली जाईल व नंतरच नदीपात्रातील पुढील खोलीकरणाचे काम सुरू केले जाईल असे यावेळी आ. पाटील यांनी स्पष्ट केले. शेवटी नगराध्यक्ष संपत डोके यांनी सर्वांचे आभार मानले. (प्रतिनिधी)
तामलवाडी : गावात भासणारी पाणी टंचाई व कूपनलिकेच्या पाण्यातून उद्भवणारे आजार यावर मात करण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा गावकऱ्यांनी सरकारी मदतीची अपेक्षा न करता एका दिवसात अडीच लाखाचा लोकवाटा जमा केला. सहा दिवसात १७ फुट विहिरीचे खोदकाम केले. ७ फूट खोलीवरच पाणीही लागले. सध्या १७ फूट खोल विहिरीतून इंजीनद्वारे अडीच तास पाणी उपसा केला जातोय. या विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.
माळुंब्रा गावची लोकसंख्या अडीच हजारावर आहे. सतत पाणी टंचाईला तोंड देत यंदा दुष्काळी परिस्थितीत पाण्यासाठी गावकऱ्यांचे हाल झाले. २ बोअर अधिग्रहण करुन नंतर बालाजी अमाईन्सच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा करुन गावची तहान भागविली जाते. मात्र सततच्या टंचाईच्या जोखडातून मुक्तता व्हावी, या उद्देशाने ग्रामस्थांनी लोकवाटा जमा करण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीही केली. एका दिवसात अडीच लाखांचा लोकवाटा जमा केला. लागलीच या माध्यमातून भारती तलावाखाली पोकलेन मशीनच्या मदतीने १७ फूट खोल विहिरीचे काम करण्यात आले. अवघ्या सात फुटावर पाणी लागले. सदरील विहीर ४० फुटापर्यंत खोदण्यात येणार आहे. या विहिरीपासून अवघ्या अर्धा किमी अंतरावर सावर्जनिक विहीर आहे. या विहिरीमध्ये पाणी सोडून गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. लोकवाटा जमा करण्यासाठी गजानन वडणे, महादेव वडणे, शिवाजी वडणे, भाऊसाहेब सुपते, नितीन जाधव, दादाहरी बागल, दिलीप गाटे आदींनी पुढाकार घेऊन यशस्वी
टंचाईमुक्त गावाकडे वाटचाल सुरु केली आहे.
लोहारा : शहरालगत असलेल्या गाव तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा शुभारंभ तहलसिलदार ज्योती चौहाण यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी करण्यात आला आहे.
लोहारा शहरात सातत्याने उद्भवणाऱ्या पाणीटंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. बोअर, विहिरींनी तळ गाठल्यामुळे नागरीकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून सर्वत्र जलसंधारणाची कामे सुरु आहेत. त्यामुळे आपल्या ही गावात कामे होणे गरजेचे असल्याची बाब लक्षात घेवून शहरातील तरूणांनी एकत्र येवून लोकवर्गणी गोळा करून गाव तलावासोबतच ओढ्यांचे रूंदीकरण व खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आजवर सुमारे दीड लाख रुपये लोकवर्गणी जमा झाली आहे. त्यानुसार शहरातगतच्या गाव तलावातील गाळ काढण्याचा शुभारंभ तहसिलदार ज्योती चौहाण यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आला.
शहराच्या चार ही बाजूच्या सुमारे आठ ते दहा किमी ओढ्याचे खोलीकरण व रूंदीकरण करण्यात येणार आहे.
कार्यक्रमास माजी सरपंच नागान्ना वकील, बालाजी मक्तेदार,माजी सरपंच शंकर जट्टे, दत्ता फावडे ,बाबा शेख, प्रशांत लांडगे, गणेश कुलकर्णी, बाळासाहेब पाटील,मदन कुलकर्णी, श्रीशैल जट्टे, नगरसेवक बाळू कोरे, श्रीनिवास माळी, शंकर मुळे, सलिम कुरेशी, बाबु हेड्डे, शेखर माणिकशेट्टी, अमोल बिराजदार, श्रीकांत भरारे, दिपक पोतदार , व्यंकट पोतदार, विक्रांत संगशेट्टी, मिलींद नागवंशी, कल्याण ढगे, पिंटू लोखंडे, शिवदास फरीदाबादकर, अदिनाथ माळी आदी नागरीक मोठ्यासंख्येने उपस्थितीत होते. (वार्ताहर)

Web Title: Folklore for water conservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.