माळकोंडजीत चारा छावणीवरच पोळा
By Admin | Updated: September 13, 2015 00:05 IST2015-09-12T23:53:35+5:302015-09-13T00:05:38+5:30
रमेश शिंदे ,औसा बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे

माळकोंडजीत चारा छावणीवरच पोळा
रमेश शिंदे ,औसा
बैलपोळा म्हटलं की, शेतकरी आपण ज्या बैलाच्या जीवावर शेती कसतो, त्या बैलाच्या कष्टातून ऋणमुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण यावर्षी पाऊसच न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे पशुधन आज चारा छावणीवरच होते़ त्या शेतकऱ्यांनी पशुधनासह छावणीवरच मोठ्या उत्साहात पोळा साजरा केला. या सणाचा संपूर्ण खर्च छावणी चालविणाऱ्या माणदेशी फाउंडेशनने केला.
पावसाळा सुरु होऊन तीन महिने संपले तरीही औसा तालुक्यात पाऊस झाला नव्हता. चाऱ्याअभावी पशुधनाची ससेहोलपट होत होती. जनावराच्या चाऱ्यासाठी शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेतला. ३० आॅगस्टरोजी औसा तालुक्यातील माळकोंडजी येथे माणदेशी फाऊंडेशनने चारा छावणी सुरु केली. या चारा छावणीमध्ये सध्या ८८८ जनावरे आहेत. यात २५० बैल आहेत. चारा छावणी सुरु झाल्यानंतर माणदेशी फाउंडेशनने येथे शेतकऱ्यांना चारा, पाणी, पशुखाद्य आदी सुविधा पुरविल्या आहेत.
बैल पोळा हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करातो. पण यावर्षी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या शेतकऱ्यांना पोळ््याचा सण कसा साजरा करावा याची चिंता भेडसावत होती. मात्र त्यासाठी ही माणदेशी फाउंडेशन पुन्हा पुढे आली.
आपलीच जनावरे समजून त्यांनी २५० बैलांना म्होरक्या, कंडे, शिंगासाठी रंग, बेगड यासह अन्य सजावटीचे साहित्य दिले. छावणीवरच वाजत-गाजत बैल पेळ््याचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यासंदर्भात बोलताना माणदेशी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक रेखा कुलकर्णी, छावणीचे प्रमुख रविंद्र वीरकर म्हणाले, आम्ही छावणी चालवतो म्हणजे येथील सर्वच पशुधन आमचे ही भावना ठेवून मुक्या जनावरांचा हा सण उत्साहात साजरा करायचा असे ठरविले आणि सणांसाठी लागणारा सर्व खर्चही फाउंडेशनने उचलला आहे.
लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे यंदा पोळा सण अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी पूजेनंतर जिल्हाभरात ठिकठिकाणी झालेल्या पावसामुळे पशुपालकांसह बळीराजा सुखावला आहे. गत तीन वर्षांपासून सातत्याने लातूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चारा-पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पशुपालकांना पशुधन जगविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. परिणामी, दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या पशुपालकांना यंदा पोळा ‘रिन काढून सण’ करावा लागला. यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. यातून खरीप पीक पूर्णत: वाया गेले. परिणामी, पाण्यासह तीव्र चाराटंचाई जाणवत आहे.