भोंदूबाबाच्या घराची झाडाझडती
By Admin | Updated: July 31, 2014 01:26 IST2014-07-31T01:11:58+5:302014-07-31T01:26:02+5:30
औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पोलिसांच्या मदतीने अनेकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा ऊर्फ साहेबखान यांच्या नारेगाव येथील घराची बुधवारी पोलिसांनी झडती घेतली
भोंदूबाबाच्या घराची झाडाझडती
औरंगाबाद : जादूने पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून पोलिसांच्या मदतीने अनेकांना लुटणाऱ्या टोळीचा म्होरक्या भोंदूबाबा ऊर्फ साहेबखान यांच्या नारेगाव येथील घराची बुधवारी पोलिसांनी झडती घेतली तसेच त्याच्या लुटमारीच्या ठिकाणाचाही पंचनामा करण्यात आला.
अकोला येथील दीपक दुबे व त्यांच्या पाच मित्रांना जादूने पैशाचा पाऊस पाडून पैसे चारपट करून देतो, असे सांगून नारेगाव येथील भोंदूबाबा साहेबखान व त्याच्या साथीदारांनी ३ जुलै रोजी गंडविले होते. सिडको एमआयडीसी पोलीस दाद देत नसल्याने अखेर दुबे व त्यांच्या मित्रांनी मंगळवारी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांची भेट घेतली. तेव्हा आयुक्तांनी तातडीने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. तेव्हा कोठे बाबा व त्याच्या साथीदारांविरुद्ध सिडको एमआयडीसी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे भोंदूबाबाच्या या टोळीत सिडको एमआयडीसी ठाण्याचे काही पोलीस सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. या भोंदूबाबाचे पंटर ग्राहक शोधून आणायचे. चिकलठाणा परिसरातील केम्ब्रिज शाळेच्या जवळच असलेल्या एका शेतात बाबा व त्याचे साथीदार ग्राहकाला पैशाचा पाऊस पाडून देण्यासाठी घेऊन जायचे. जादूचा खेळ सुरू होताच पोलीस तेथे छापा मारायचे आणि सगळे काही घेऊन जायचे... नंतर बाबा आणि पोलीस लुटलेल्या रकमेत ‘फिफ्टी- फिफ्टी’ वाटा करायचे. अशा पद्धतीने चोर- पोलिसांच्या या टोळीने अनेकांना लुटल्याचे आता समोर येऊ लागले आहे.
मंगळवारी बाबा साहेबखान व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर बुधवारी सकाळी सिडको एमआयडीसी पोलिसांनी बाबाच्या नारेगाव येथील घरावर छापा मारला. झडती घेतली असता, घरात बाबा सापडला नाही. परंतु जादूटोण्याचे साहित्य सापडले. शिवाय ज्या धान्याच्या कोठीत तो पैसे दाखवायचा, ती कोठी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर घराचा पंचनामा केला. चिकलठाण्यातील शिवनेरी ढाब्याच्या बाजूला असलेल्या शेतातील घटनास्थळ आणि एन-१ पोलीस चौकीचाही पोलिसांनी फिर्यादीसोबत पंचनामा केला.
गुन्ह्याची व्याप्ती मोठी
यासंदर्भात पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधला असता भोंदूबाबाच्या या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणात दररोज नवनवीन तक्रारदार समोर येत आहेत. त्यामुळे आपण स्वत: या गुन्ह्यात लक्ष घातले असून, या संपूर्ण प्रकारणाचा छडा लावण्यात येईल. कुणाचीही गय केली जाणार नाही, असे चावरिया यांनी स्पष्ट केले.
आणखी एक गुन्हा
भोंदूबाबाने गंडविलेल्या संतोष सातपुते (रा. भारतनगर) याची तक्रार घेण्यास गेल्या काही दिवसांपासून सिडको एमआयडीसी पोलीस टाळाटाळ करीत होते.
दरम्यान, मंगळवारी भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा नोंदविल्यानंतर संतोषने बुधवारी पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया यांची भेट घेतली आणि हकिकत सांगितली.
चावरिया यांनी तातडीने संतोषचीही फिर्याद घेऊन गुन्हा नोंदविण्याचे आदेश सिडको एमआयडीसी पोलिसांना दिले. रात्री उशिरापर्यंत संतोषची फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते.
फौजदार गंधारेंचे नाव
सव्वाआठ लाखाला फसविल्या गेलेल्या संतोष सातपुते या तरुणाने आपल्या तक्रारी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या फौजदार गंधारे यांचे नाव घेतले आहे.
गंधारे आपल्या दोन साथीदारांसह त्या शेतात आले आणि त्यांनी बाबाच्या हातातून त्या औषधी बाटल्या फोडल्या, असे संतोषने दिलेल्या तक्रारी म्हटलेले आहे.
विशेष म्हणजे तक्रारीत पोलिसांचे नाव का टाकले, असे म्हणत ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने मला दमदाटी केली होती, असे संतोषने ‘लोकमत’ला सांगितले.