नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प; मृग नक्षत्राच्या आरंभालाच मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:58 PM2021-06-10T12:58:06+5:302021-06-10T12:59:22+5:30

परभणी जिल्ह्यात जिंतूर, पूर्णा आणि हिंगोलीमध्ये साखरा परिसरात अतिवृष्टी झाली.

Floods in rivers and streams, traffic jams; Presence of rain all over Marathwada at the beginning of Mrig Nakshatra | नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प; मृग नक्षत्राच्या आरंभालाच मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी

नद्या-नाल्यांना पूर, वाहतूक ठप्प; मृग नक्षत्राच्या आरंभालाच मराठवाड्यात सर्वदूर पावसाची हजेरी

googlenewsNext
ठळक मुद्देकाही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने मोठे नुकसानवीज पडून तरुणी मृत्युमुखीनांदेडात वृक्ष उन्मळून पडले

औरंगाबाद : मृग नक्षत्रात आरंभालाच मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात वीज पडून तरुणी मृत्युमुखी पडली. परभणी जिल्ह्यात जिंतूर, पूर्णा आणि हिंगोलीमध्ये साखरा परिसरात अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातही मृगधारा जोरदार बरसल्या, वादळी वाऱ्यामुळे शहरात तीन झाडे उन्मळून पडली. जालन्यात रिमझिम बरसला तर बीडमध्ये कन्हेरवाडीजवळ पुलाचा भराव वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली होती. लातूरमध्ये तुरळक हजेरी लावली तर उस्मानाबादेत हुलकावणी दिली.

बुधवारी दुपारनंतर औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. बहुतांश नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतूक काही काळ खोेळंबली होती. वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव शिवारात शेतकरी सुरेश विठ्ठल वाघ यांच्या दोन दुभत्या गायी वीज पडून ठार झाल्या. फुलंब्री तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला. यात वीज पडून बाभूळगाव तरटे येथील समृद्धी विष्णू तरटे (१८) ही तरुणी ठार, तर तिची भावजय शीतल तरटे (२४) जखमी झाली आहे. फुलंब्री - खुलताबाद रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली होती. फुलंब्री पानवाडी रस्त्यावरील फुलमस्ता नदीला आलेल्या पुरात पुलावरून पाणी वाहत असल्याने दुचाकीसह दोघे जण वाहून जात असताना सुदैवाने वाचले. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे जुई नदीला पूर आल्याने जळगाव - औरंगाबाद महामार्गावर १० दिवसांपूर्वी उभारलेला पर्यायी पूल वाहून गेला. यामुळे सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. याचप्रमाणे कन्नड, सोयगाव, औरंगाबाद, गंगापूर तालुक्यातही सर्वदूर पाऊस झाला.
पावसामुळे परभणी-गंगाखेड या रस्त्यावर जागोजागी रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सरासरी २६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. मंगळवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने नांदेड शहरातील तीन झाडे उन्मळून पडली आहेत. याअगोदर झालेल्या पावसाने अर्धापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनी खरडून गेल्या होत्या. नांदेड जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खरिपाच्या पेरण्यांनाही शेतकऱ्यांनी प्रारंभ केला आहे. माहूर तालुक्यात ४४ मि.मी. तर उमरी तालुक्यात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली.

जालना जिल्ह्यात बुधवारी काही ठिकाणी रिमझिम, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. जालना शहरात सायंकाळी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.

बीड जिल्ह्यात बुधवारी दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. परळी-अंबाजोगाई मार्गावर पुलाचा भराव वाहून गेल्याने काही वेळ संपर्क तुटला होता.

हिंगाेली : आजेगाव, साखरा परिसरात १२१ मि.मी.
जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात साखरा व आजेगाव मंडळात अतिवृष्टी झाली. साखरा येथे १२१ मि.मी. आणि आजेगाव मंडळात ६५ मि.मी. पाऊस झाला. जिल्ह्यात मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. रात्रभर सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे.

परभणी : कावलगाव मंडळात अतिवृष्टी
बुधवारी पहाटेच्या सुमारास परभणी जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पाऊस पडतो आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. परभणी, जिंतूर आणि पूर्णा या तालुक्यांत पावसाचा जोर जास्त होता. जिंतूर तालुक्यातील जिंतूर मंडळात १०० मि.मी., आडगाव मंडळात ८२ मि.मी., दूधगाव मंडळात ८१ मि.मी., पूर्णा तालुक्यातील कावलगाव मंडळात ११४.८ मि.मी., लिमला ६७, कात्नेश्वर ६८ आणि चुडावा मंडळात ६५.५ मि.मी. पाऊस झाला असून, अतिवृष्टीची नोंद झाली आहे. परभणी मंडळात ६१ मि.मी. पाऊस झाला.

Web Title: Floods in rivers and streams, traffic jams; Presence of rain all over Marathwada at the beginning of Mrig Nakshatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.