लढाऊ कार्यकर्त्यांचा पोशिंदा हरवला
By Admin | Updated: June 5, 2014 00:47 IST2014-06-05T00:35:19+5:302014-06-05T00:47:12+5:30
लातूर : गोपीनाथ मुंडेंसाठी वाट्टेल ते केले. आंदोलने केली. भाषणे केली. सावलीसारखा सोबत वावरलो.
लढाऊ कार्यकर्त्यांचा पोशिंदा हरवला
लातूर : गोपीनाथ मुंडेंसाठी वाट्टेल ते केले. आंदोलने केली. भाषणे केली. सावलीसारखा सोबत वावरलो. माझा नेता कायम माझ्या डोळ्यात बसविण्याचा प्रयत्न करायचो. तो एवढा मोठ्ठा की डोळ्यात कधी मावायचाच नाही. परंतु त्यांच्या पार्थिवाला या डोळ्याने पाहण्याचे दुर्दैवं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नशिबाला आले, हा प्रसंग माझ्यासाठी अत्यंत दु:खद होता. माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पोशिंदाच जणू गेला, अशा शब्दात गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबर सावलीसारखे राहणार्या माजी आमदार पाशा पटेल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडेंचे अपघाती निधन झाले तेव्हा पाशा पटेल हे दिल्लीतच होते. त्यांचा निष्ठावंत कार्यकर्ता असलेल्या माजी आमदार पाशा पटेल यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता, त्यांना आपल्या भावना अनावर झाल्या होत्या. आता आपला पोशिंदा गेला अशा शब्दातून वाट मोकळी करीत ते म्हणाले, मला आठवते, मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेची कमान सांभाळीत होतो. मराठवाड्यातला शेतकरी संघटनेचा लढाऊ कार्यकर्ता म्हणून माझी प्रतिमा होती. केंद्रात अटलबिहारी सत्तेत आले आणि राज्यात युती होती. शरद जोशी केंद्रात कलले आणि त्यांना राज्यमंत्र्यांचा दर्जा द्यायचे भाजपाने ठरविले. ही बाबत महाराष्टÑात वार्यासारखी पसरली. त्याबरोबर एक शरद जोशी यांना अट घालण्यात आली होती. ती अट म्हणजे तुम्ही केंद्रात आमच्यासोबत आल्यावर आम्हाला राज्यासाठी भाजपाच्या पदरात पाशा द्या. ही अट खुद्द गोपीनाथ मुंडे यांनी घातल्याचे मला शरद जोशींनी बोलावून सांगितले. आणि म्हणाले उद्या प्रदेश भाजपा कार्यालयात जाऊन त्यांची भेट घे. मी गेलो. त्यांनी माझे आदराने स्वागत केले. आयुष्यभर शेतकर्यांच्या प्रश्नावर राज्यात आंदोलने करणार्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा पदर हा फाटकाच होता. मी अनेक निवडणुका लढविल्या खर्या. पण यश कुठे होते ? ही अपयशाची मालिका मुंडे साहेबांनी खंडीत केली आणि पाशाला आमदार केले. गोरगरिब शेतकर्यांचा पाशा.. लातूरचा पाशा...रस्त्यावरचा पाशा आमदार झाला... विधानपरिषदेवर गेला. माझ्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांच्या अंगाला विजयाचा पहीला गुलाल मुंडेंनीच लावला. त्यांच्याकडची जादूची कांडी खरोखर जादूची होती. भाजपाची शेतकरी आघाडी मी सांभाळायचो. मी आंदोलने केली त्यांना बोलवायचो. औरंगाबादच्या ऊस जाळणे आंदोलनावेळी आमच्यावर लाठ्या पडल्या. साहेबांवरही पडल्या. लटक्या रागात ते म्हणाले, आता या वयात मला लाठ्या खायला घालतो काय ? पण असे झाले तरी त्यांनी माझ्या आंदोलनाचे निमंत्रण नाकारले नाही. उद्घाटन नाही तर समारोपाला ते यायचेच. मग दिंडी असो की मोर्चा. मी त्यांच्यासोबत राज्यातच नव्हे तर आंध्रप्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान असे कितीतरी राज्ये फिरलो. जसे शेतकर्यांनी रस्त्यावर शिकविले तसे मुंडेंनी फिरस्तीवर शिकविले. तेच कर्तेधर्ते होते. आता गाय हरविल्यावर जशी गत वासराची होती तशी माझी झालीय. एकदा पंकजाताई म्हणाल्या, तुमचा वारस कोण ? मी सारखा मुंडे साहेबांच्या सोबत वावरायचो. कुठे प्रवासाला निघालो की मीच सोबत. निवडणुकीच्या कामाला निघालो की मीच सोबत. प्रचाराला निघालो सोबत. एखाद्या कार्यक्रमाला निघालो तरी मीच सोबत असायचो. माझा मुंडेंच्या घरातील वावरही एवढा वाढला होता की पंकजातार्इंनी माझ्यासमोर लटक्या रागात विचारले, पप्पा, तुमचा वारस मी आहे की पाशा? एकदा सांगा ... माझ्यासारख्या सर्वसामान्य नेत्याला एवढे प्रेम कोणते घर आणि नेता देणार ? अरे, जे कुणीच दिले नाही ते मुंडेंनी दिले होते, ते हेच तर प्रेम होते. ग्रामविकास मंत्रीपदाचे आठ दिवस... २६ मे रोजी शपथविधी झाला. ग्रामीण विकास खात्याची धुरा खांद्यावर आली. अवघे आठ दिवस पूर्ण झाले होते. महाराष्टÑासाठी काय करू... हे करू.. ते करू... कित्येक योजना बोलून दाखविल्या. ग्रामविकास सारखे महत्त्वाचे खाते मिळाले आहे. आता नियोजन करु. १३ जूनला गांधी पीस फौैंडेशनमध्ये तज्ज्ञांची परिषद बोलवू. राजेंद्रसिंह येतील. महाराष्टÑातून पोपटरावांना सोबत घेऊ. ग्रामविकासाचे मॉडेल म्हणून एक गाव पुढे आणू.... अशा एक ना अनेक योजना गोपीनाथराव मुंडे यांनी मनोमन आखल्या. माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना कामाला लागा सूचना दिल्या. आता हे सर्व काही जिथल्या तिथे थांबले आहे, असे पाशा पटेल गहिवरून सांगत होते.