झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

By प्रशांत तेलवाडकर | Published: April 13, 2024 06:58 PM2024-04-13T18:58:29+5:302024-04-13T18:59:07+5:30

निळा झेंडा बनविण्यास सुरुवात केली आणि त्यांचे दिवस पालटले.

Flags fill many people's lives with 'colour'; The flags of Chhatrapati Sambhajinagar are also flying abroad | झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

झेंड्यांनी भरला अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’; परराज्यातही फडकतात छत्रपती संभाजीनगरचे झेंडे

छत्रपती संभाजीनगर : भगवा, निळा, पिवळा, गुलाबी, लाल झेंड्यांचा वापर हा अनेकांसाठी सण-उत्सव, जयंती, आंदोलनापुरताच मर्यादित आहे. मात्र, हे झेंडे अनेकांच्या आयुष्यात ‘रंग’ भरण्याचे काम करीत आहेत. शहरातील सुमारे २० कुटुंबांचा उदरनिर्वाह याच झेंड्यांच्या निर्मितीतून चालतो. छत्रपती संभाजीनगरचे झेंडे आता मध्य प्रदेशापर्यंत जाऊन पोहोचले आहेत, असे तेवढ्याच अभिमानाने हे कुटुंब सांगतात.

सिडको एन ६ येथील रहिवासी केशवराव सोनवणे हे देवगिरी कंपनीत कामाला होते. कंपनी बंद पडली आणि असे दिवस आले की, त्यांना कोणी उधार देणेही बंद केले. एवढेच काय गल्लीतील लोकांनी चहा पिण्यासाठी २ रुपयेसुद्धा दिले नाहीत. त्याच वेळेस त्यांनी ठरविले की, आपण कोणाकडून उधार घ्यायचे नाही. आणि सुरू झाली स्वाभिमानी जगण्याची लढाई. २००२ पासून त्यांनी निळा झेंडा बनविण्यास सुरुवात केली आणि त्यांचे दिवस पालटले.

निळा झेंडा, भगवा झेंडा यांची सर्वाधिक विक्री होऊ लागली. वर्षभर झेंड्यांची ऑर्डर मिळत असल्याने कुटुंबातील हात कमी पडू लागले. मग, त्यांनी झेंडे शिलाईचे काम गरजू महिलांना देणे सुरू केले. आजघडीला २० महिला झेंड्यांची शिलाई, लेस लावण्याचे काम करतात. यात संभाजी कॉलनीसह रामनगर, विठ्ठलनगर, भावसिंगपुरा, जटवाडा रोड येथील महिलांचा समावेश आहे. दीक्षाभूमी ते चैत्यभूमीपर्यंत तसेच भीमा-कोरेगाव असो वा मध्य प्रदेशातील भोपाल शहरापर्यंत छत्रपती संभाजीनगरात तयार झालेल्या झेंड्यांना मागणी आहे. कारण, दर्जेदार कपडा व डबल शिलाई असल्याने ते जास्त दिवस टिकतात. हेच आमच्या झेंड्यांचे वैशिष्ट्य असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

पताके लावले... अबोल गल्ली बोलकी झाली
केशवराव सोनवणे यांनी सांगितले की, संभाजी कॉलनीत त्यांच्या गल्लीमध्ये पूर्वी कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हते. प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त असत. २२ जानेवारीला अयोध्येतील श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त झेंड्यातून उरलेल्या कापडातून भगवा व निळ्या कपड्यांचे पताके तयार केले व संपूर्ण गल्लीत लावले. यामुळे गल्लीचे रूपडे पालटले. सर्व रहिवासी एकत्र आले, त्यांनी भंडारा सुरू केला. आता प्रत्येक जयंती उत्सवात गल्लीत भंडारा दिला जातो. अबोल गल्ली पताक्याने बोलकी झाली, सर्व जण एकजूट झाले.. हे सांगताना सोनवणे यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते.

Web Title: Flags fill many people's lives with 'colour'; The flags of Chhatrapati Sambhajinagar are also flying abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.