साडेपाच हजार शिक्षक बदलीसाठी पात्र
By Admin | Updated: June 9, 2017 01:05 IST2017-06-09T01:03:39+5:302017-06-09T01:05:50+5:30
औरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले

साडेपाच हजार शिक्षक बदलीसाठी पात्र
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बदली धोरणानुसार सोप्या क्षेत्रात सलग १० वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले असून, अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे नोकरी करणाऱ्या शिक्षकांना बदली हक्क प्राप्त शिक्षक समजण्यात आले आहे. जिल्ह्यातील अशा बदलीपात्र आणि बदली हक्क प्राप्त शिक्षकांची यादी आज गुरुवारी शिक्षण विभागाने जि. प. कन्या शाळेच्या दर्शनी भागात डकवली आहे. या यादीवर शिक्षकांकडून आक्षेप मागविण्यात आले असून, चार दिवसांत आक्षेप प्राप्त झाल्यानंतर अंतिम यादी जाहीर होणार आहे.
शिक्षकांच्या बदल्यांसाठी ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार यंदा सोपे आणि अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित केल्या असून, सोप्या क्षेत्रात सलग दहा वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीपात्र समजण्यात आले, तर अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा करणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी प्रथम प्राधान्य अर्थात बदली हक्क प्राप्त शिक्षक संबोधण्यात आले आहे. यास विविध शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आक्षेप घेतले असून, सध्या खंडपीठाने आहे ती परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या तयार करा; पण पदस्थापना देऊ नका, असेही आदेशात खंडपीठाने म्हटले आहे. त्यानुसार शासनाने शिक्षण विभागाला सूचना दिल्या. त्या सूचनानुसार शिक्षण विभागाने सोप्या क्षेत्रात कुठेही अथवा कोणत्याही शाळेत सलग दहा वर्षांची सेवा करणारे शिक्षक तसेच सलग तीन वर्षे अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये सेवा करणाऱ्या शिक्षकांचा यादीत समावेश केलेला आहे.
यासंदर्भात शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख व उपशिक्षणाधिकारी रवींद्र वाणी यांनी सांगितले की, यादी शिक्षकांच्या अवलोकनार्थ जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रवेशद्वारासमोर डकवण्यात आली आहे. शासनाच्या सूचनेनुसार बदलीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून ठेवली जाणार आहे.