पाच घरे जळून खाक
By Admin | Updated: April 11, 2017 00:05 IST2017-04-11T00:03:49+5:302017-04-11T00:05:32+5:30
लोहारा : तालुक्यातील मार्डी येथील पाच घरांसह दोन गोठ्यांना अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी घडली

पाच घरे जळून खाक
लोहारा : तालुक्यातील मार्डी येथील पाच घरांसह दोन गोठ्यांना अचानक आग लागून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे पाचही कुटूंबांचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, ही कुटूंबे अक्षरश: उघड्यावर आली आहेत.
तालुक्यातील मार्डी येथे सोमवारी सकाळी ग्रामस्थ आपापल्या कामाला गेले अतसानाच साडेदहाच्या सुमारास अचानकपणे ही आग लागली. या आगीत मारूती शेंडगे, आत्माराम हरिबा सोलंकर, औदुंबर खटके यांचे घर, घरातील संसारोपयोगी साहित्य, जीवनावश्यक वस्तू, शेतमाल, वैरण, शेतीची औजारे जळून खाक झाली. मुळातच निराधार असलेल्या नौशाद पठाण, किसकिंदा व्यंकट पाटील यांच्याही घराला आग लागल्याने त्यांनी मोलमजुरी करून थाटलेला संसार जळून खाक झाला. भांडी, अन्नधान्य, कपडे, सोने, रोख रक्कम यासह मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, न्यायालयीन दस्ताऐवज असे कागदपत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. नौशाद पठाण व किसकिंदा पाटील हे निराधार आहेत. यातील पठाण यांना एक मुलगा व एक मुलगी असून, मुलाच्या शिक्षणासाठी पै-पै मोलमजुरी करुन जमा केलेली रक्कम व सोने जळून खाक झाले. किसकिंदा पाटील यांची ही अशीच परिस्थिती झाली आहे. रब्बी हंगामात शेतात रोजाने जाऊन ज्वारी काढणी करुन गोळा करुन ठेवलेले धान्याची क्षणात राख झाली.
युसूफ पठाण, हणमंत शेंडगे, सूर्यकांत देवकर या शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेल्या कडब्यांच्या गंजी, गुळीसह सर्व वैरण या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, वारा व उन्हाच्या तडाख्यामुळे ही आग आटोक्यात येत नव्हती. आगीचे रौद्ररूप पाहून नागरिकांनी तुळजापूर, उमरगा नगरपालिका व लोकमंगल कारखान्यावरील अग्निशामक दलास पाचारण केले. त्यामुळे अग्निशामक दलाचे वाहन लगेच घटनास्थळी दाखल झाले. तब्बल दीडतासाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली. परंतु, तोपर्यंत आगीने परिसरातील घर, वैरण मिळेल ते कवेत घेवून खाक केले होते.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार दत्ता कांबळे, तलाठी दिगंबर माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून शासनाची मदत लवकर मिळवून देण्याचे आश्वासन दिले. आग विझविन्यासाठी गावातील नरदेव कदम, उमेश देवकर, बाळासाहेब पाटील, रमेश कदम, महादेव कदम, श्रीराम पाटील, गोविंद कदम, दत्ता देवकर, योगेश देवकर, दीपक कदम, किशोर कदम आदींनी प्रयत्न केले.