औरंगाबाद : मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाचा करोडी फाट्याजवळ भरधाव ट्रकने चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दाम्पत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यामुळे त्यांचे मृतदेह उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. संजय पूनमसिंग छानवाल (५१) आणि मीना संजय छानवाल (४६, दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. त्यांचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याचे रीतसर निमंत्रण नातेवाइकांना देण्यासाठी ते मोटारसायकलवरून राजेवाडी (ता. बदनापूर) येथे निघाले होते. मात्र, धुळे-सोलापूर महामार्गावर काम सुरू असलेल्या उड्डाणपुलाखालून जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. यात ते ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. ट्रकने त्यांना काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.
उद्या परत येऊ, असे सांगून गेले अन्...संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे आज रात्री मुक्काम करू आणि उद्या (शनिवारी) दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने ते कधीच घरी परतणार नाहीत. त्यांच्या मृत्यूमुळे छानवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.