रोहयो अपहारातील पाच आरोपी अटकेत
By Admin | Updated: November 18, 2014 01:10 IST2014-11-18T00:52:37+5:302014-11-18T01:10:06+5:30
पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामात २००६ साली झालेल्या अपहार प्रकरणी फरार असलेल्या पाच जणांना रविवारी रात्री अटक करण्यात आली

रोहयो अपहारातील पाच आरोपी अटकेत
पाचोड : पैठण तालुक्यातील पारुंडी येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामात २००६ साली झालेल्या अपहार प्रकरणी फरार असलेल्या पाच जणांना रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता सहा झाली असून, अन्य चौघे अद्याप फरार आहेत.
पारुंडी गावात इ.स. २००६ साली महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून मातीनाला बांधकाम, जोडरस्ता, शेततळे, रोपवाटिका आदी कामांसाठी १ कोटी ७ लाख ७४ हजार ५०१ रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते; पण प्रत्यक्षात कामे झालीच नाहीत व या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार गावातील डॉ. अरुण राठोड व कल्याण राठोड यांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती.
यानंतर उच्चस्तरीय समितीतील अधिकाऱ्यांनी पारुंडी गावात चौकशी केली असता विविध कामांत अनियमितता आढळून आल्यामुळे व या कामात ८७ लाख ५९ हजार ९६० रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पैठण पंचायत समितीमधील विस्तार अधिकारी गोरखनाथ शंकरराव पवार यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन गटविकास अधिकारी प्रदीप काकडे, सरपंच बाजीराव राठोड, कनिष्ठ अभियंता कमलाकर शिंदे, कनिष्ठ अभियंता व्ही.जी. कुलकर्णी, ग्रामसेवकांत कारभारी गव्हाणे, शिवाजी वावरे, सुहास पाटील, ग्रामरोजगार सेवक सुधाकर राठोड व पोस्टमास्तर शेख इफ्तेखार ऊर्फ मोसीन यांच्या विरोधात १९ मार्च २०१४ रोजी गुन्हे दाखल झाले होेते, तेंव्हापासून हे दहाही आरोपी फरार झाले होते.