मच्छीमारांच्या झोपड्या जाळल्या

By Admin | Updated: May 12, 2014 00:09 IST2014-05-11T23:19:38+5:302014-05-12T00:09:07+5:30

माजलगाव : येथील केसापूरी कॅम्पवरील मच्छीमार भोई समाजाच्या दोन झोपड्या रविवारी पहाटे पेटवून दिल्या

Fishermen's huts were burnt | मच्छीमारांच्या झोपड्या जाळल्या

मच्छीमारांच्या झोपड्या जाळल्या

 माजलगाव : येथील केसापूरी कॅम्पवरील मच्छीमार भोई समाजाच्या दोन झोपड्या रविवारी पहाटे पेटवून दिल्या. सुदैवाने झोपडीत कोणी नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या घटनेने मच्छीमारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. माजलगाव धरणामध्ये भोई समाजाचे काही कुटुंब मासेमारी व विटभट्ट्याचे काम करतात. धरणाच्या काठावरच ते झोपड्यांमध्ये राहतात. शनिवारी रात्री परमेश्वर सुभाष घटे हे आपल्या कुटुंबियांसमवेत झोपडीच्या आहेर झोपले होते. रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घटे यांच्या झोपडीला अज्ञात व्यक्तीने आग लावली. त्यानंतर शेजारच्या झोपडीनेही पेट घेतला. दोन्ही झोपड्या घटे यांच्या मालकीच्या होत्या. आग इतकी भीषण होती की, अवघ्या काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, मासे पकडण्याचे जाळे जळून भस्मसात झाले. या घटनेनंतर भोई समाज एकत्रित आला. त्यांनी शहर ठाणे गाठून कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला; पण पोलिसांनी त्यांच्यावरच प्रश्नांचा भडीमार करत त्यांची मूळ तक्रार नोंदवून घेतली नाही. केवळ अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करुन घेतला. मच्छीमारांची आधी रोजीरोटी हिरावली आता त्यांचे संसार उघड्यावर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. झोपड्या कोणी जाळल्या? याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आव्हान संघटनेचे डॉ. उद्धव नाईकनवरे यांनी केली आहे. दरम्यान, माणिकशहा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मासेमारीचा ठेका आमच्या संस्थेला पाच वर्षांसाठी मिळालेला आहे. काही जण बेकायदेशीरपणे मासेमारी करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावरच कारवाई व्हावी. तपास योग्य दिशेने माजलगाव येथील केसापूरी कॅम्पवरील घटनेची कसून चौकशी करण्यात येईल. ठेकेदार व मच्छीमारांत जुनाच वाद आहे. हा विषय महसूलच्या अखत्यारित आहे. पोलिसांवर नाहक आरोप केले जात आहेत, असे पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. कायदा हातात घेतला तर कोणाचीही गय नाही, असा इशारा त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला. (वार्ताहर) पोलिसांची अरेरावी! परमेश्वर घटे हे शहर ठाण्यात झोपडी जाळल्याप्रकरणी फिर्याद देण्यासाठी गेले. तेंव्हा तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली. आव्हान संघटनेने मच्छीमारांसाठी आंदोलनाचा लढा उभारलेला आहे. या संघटनेच्या डॉ. उद्धव नाईकनवरे यांच्याशीही सहायक निरीक्षक वाहेद खान पठाण यांनी हमरीतुमरीची भाषा केली.

Web Title: Fishermen's huts were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.