पहिल्या टप्प्यात १२ हजार ३०७ जणांना देणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:05 IST2020-12-29T04:05:36+5:302020-12-29T04:05:36+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १२ हजार ३०७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ११ हजार ...

पहिल्या टप्प्यात १२ हजार ३०७ जणांना देणार लस
औरंगाबाद : जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १२ हजार ३०७ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. आतापर्यंत ११ हजार ४६३ जणांची माहिती संकलित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा कृती दलाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी मनपा अतिरिक्त आयुक्त बी. व्ही. नेमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, डॉ. वाघ, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब आदींची उपस्थिती होती.
कोरोना लसीकरण हा प्रतिबंधात्मक उपाययोजनेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. यात कोणत्याही प्रकारची हयगय होणार नाही, याबाबत सर्वांनी दक्ष राहावे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
कोरोना लसीकरण मोहीम प्रथम प्राधान्याने जिल्ह्यात व्यापक प्रमाणात राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या यशस्वितेसाठी यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे, अशी सूचना चव्हाण यांनी केली.
तालुकास्तरावर तसेच प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीबाबत प्रशिक्षण कार्यक्षम होणार आहे. जिल्ह्यात प्रत्येकाला ही लस देण्यात येणार आहे. तहसीलदारांनी प्राधान्याने तालुका कृती दलाची साप्ताहिक आढावा बैठक घेऊन लसीकरण मोहीम प्रभावी होण्याच्या दृष्टीने व्यवस्था ठेवण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
लसीकरणानंतर याबाबी बंधनकारक
लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने सर्वांनी नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना चव्हाण यांनी केल्या. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर, नर्सेस, सहायक, कर्मचारी, पॅरामेडिकल स्टाफ यांच्यासह सर्व शासकीय, खासगी आरोग्य यंत्रणांमधील सर्वांची लसीकरणासाठी नोंदणी करून त्यांना लस देण्याचे नियोजन आहे.