सातारा येथील अंगणवाडीत पहिला तास खड्ड्यांचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:05 IST2021-07-16T04:05:51+5:302021-07-16T04:05:51+5:30
- साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : सातारा येथे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या बालवाडीची वर्गखोली ...

सातारा येथील अंगणवाडीत पहिला तास खड्ड्यांचा
- साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : सातारा येथे जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला बाल विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या बालवाडीची वर्गखोली घुसीने पोखरल्याने गुडघाभर जमीन खचली आहे. आपल्या पाल्यासोबत आलेले पालक हे दृष्य पाहून भांबावून गेले. चिमुकल्यांचा पहिला तास खड्ड्यांमुळे वर्गाबाहेरच गेला.
सातारा मनपाकडे वर्ग झाला असून, तरी शाळा जिल्हा परिषदेच्या अंतर्गतच आहे. या शाळेला देशातील पहिले आयएसओ मानांकन प्राप्त झालेले असल्याने शाळेत प्रवेशासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी आहे. परंतु, कोविडमुळे खबरदारी घेत फक्त १० पालकांनाच प्रवेशासाठी बोलविले जाते. अंगणवाडीदेखील अत्यंत चांगली आहे. लॉकडाऊन काळात अंगणवाडी बंद असल्याने घुशीने सर्व जमीन आतून पोखरली. त्यामुळे खोलीत दोन ते अडीच फूट खोल खड्डा पडला आहे.
अंगणवाडीकडे जाण्यासाठी अरुंद रस्ता असून, परिसरात झाडे झुडपे वाढून अस्वच्छता निर्माण झाली आहे. अंगणवाडीच्या दुरुस्तीची एकात्मिक महिला बाल विकास विभागाकडे दोन महिन्यांपूर्वीच मागणी केली आहे. परंतु, त्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही.
तक्रार करावी कुुणाकडे...
अंगणवाडी सेविका जनाबाई सोनवणे यांनी सांगितले की, हा परिसर महापालिकेत, तर शाळा जि.प.मध्ये आहे. येथे ग्रामपंचायत नाही, त्यामुळे तक्रार करावी कुणाकडे असा प्रश्न पडल्याने वरिष्ठांना कळविले आहे.
घुसीने वर्गखोली पोखरल्याचे कळविले...
सातारा येथील प्रकल्प २ मधील अंगणवाडी १ ची वर्ग खोली घुशीने पोखल्याने दुरुस्ती करण्यात यावी, असे एकात्मिक महिला बाल विकास विभागाकडे लेखी कळविले असून, अद्याप काही कारवाई झालेली नाही.
- मीना पाटील (सुपरवाईजर)
अर्ज केल्यास दुरुस्तीचे काम होईल...
सातारा येथील अंगणवाडी सेविका व एकात्मिक महिला बाल विकासमार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार केल्यास बांधकाम विभागाचे अभियंता घटनास्थळी येऊन पाहणी करून त्या खोलीच्या दुरुस्तीचे काम वरिष्ठांच्या आदेशाने घेतले जाईल. कार्यालयाकडे असा काही प्रस्ताव किंवा तक्रार आलेली नाही.
- ए. झेड. काझी (कार्यकारी अभियंता जि. प.)
कॅप्शन... जि.प. च्या एकात्मिक महिला बाल विकासमार्फत चालविल्या जाणाऱ्या अंगणवाडीची खचलेली खोली.