राज्यातील पहिले मंडळ अधिकारी कार्यालय करमाडला
By Admin | Updated: January 15, 2016 00:09 IST2016-01-14T23:57:23+5:302016-01-15T00:09:41+5:30
औरंगाबाद : तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी करमाड येथील गट नंबर १४० मधील २ एकर गायरान जमीन देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, प्रशासनाने जमीन प्रदान करण्याचे आदेश काढले आहेत.

राज्यातील पहिले मंडळ अधिकारी कार्यालय करमाडला
औरंगाबाद : तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयासाठी करमाड येथील गट नंबर १४० मधील २ एकर गायरान जमीन देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला असून, प्रशासनाने जमीन प्रदान करण्याचे आदेश काढले आहेत. राज्यात पहिल्यांदाच तलाठी, मंडळ अधिकारी कार्यालयासाठी जमीन देण्यात आली आहे.
करमाड येथे डीएमआयसी प्रकल्प होणार असल्याने या गावाचा विस्तार झपाट्याने होणार आहे. ग्रामस्थांना जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्यानंतर त्यांच्या नोंदी घेण्यासाठी धावपळ होऊ नये, यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालय एकाच इमारतीत व्हावे म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे ग्रामपंचायतींच्या ठरावाद्वारे गायरान जमीन देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या गायरान जमिनीची रेडिरेकनर दराने किंमत १ कोटी ३४ लाख ५५ हजार इतकी असून, बाजारभावानुसार ५ कोटी एवढी किंमत आहे.
जिल्हा प्रशासनाने उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नगररचना या कार्यालयांचा अभिप्राय घेऊन गट नंबर १४० मधील २ एकर गायरान जमीन तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयासाठी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. या कामासाठी अप्पर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र राजपूत, उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार रमेश मुंडलोड यांनी सहकार्य केल्याचे तलाठी संघटनेचे सतीश तुपे यांनी सांगितले.