पहिला प्रयत्न निष्फळ

By Admin | Updated: August 6, 2015 00:05 IST2015-08-06T00:02:07+5:302015-08-06T00:05:42+5:30

उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पाऊस पाडण्यासाठी बुधवारी सकाळी ढगांवर

The first attempt is to fail | पहिला प्रयत्न निष्फळ

पहिला प्रयत्न निष्फळ


उस्मानाबाद : नाशिक जिल्ह्यातील प्रयोगानंतर मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग राबविण्यात येत आहे. लातूर जिल्ह्यात पाऊस पाडण्यासाठी बुधवारी सकाळी ढगांवर रासायनिक फवारणी करण्यात आली. मात्र दुपारच्या वेळी उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात बऱ्यापैकी ढग दिसल्याने या विमानाने जिल्ह्यातील काही भागात दुपारच्या सुमारास फवारणी केली. त्यानुसार पुढच्या ४५ मिनिटे ते दोन तासात जिल्ह्यात कृत्रिम पाऊस अपेक्षित होता. मात्र दाट ढगाअभावी कृत्रिम पावसाचा हा पहिला प्रयोग यशस्वी ठरला नाही. दरम्यान गुरुवारीही कृत्रिम पावसासाठी प्रयत्न सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
ज्या ठिकाणी हा पाऊस पाडला जातो, त्या ठिकाणी ढग किती आहेत? यावर पावसाचे गणित अवलंबून असते. मिठाचे पाणी म्हणजेच सोडियम क्लोराईडचा मारा ढगावर करून तापमान कमी करून कृत्रिम पाऊस पाडला जातो. बुधवारी औरंगाबाद येथून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लातूर येथे विमान दाखल झाले होते. या विमानाने लातूर येथील काही भागात ढगांवर रसायनांची फवारणीही केली. मात्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या काही भागात ढग दिसल्याने या विमानाने दुपारी उस्मानाबादकडे आपला मोर्चा वळविला. बुधवारी सकाळपासूनच ढग सर्वत्र झाकाळून आले होते. काही ठिकाणी वाऱ्याबरोबर पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. याचा नेमका फायदा घेण्यासाठी विमानाने लगबग केली. महसूलमंत्री एकनाथ खडसे हे स्वत:ही या विमानात उपस्थित होते. जिल्ह्यातील कळंब, उस्मानाबाद, तुळजापूर, भूम आणि परंडा तालुक्यातील काही भागात या विमानाच्या माध्यमातून ढगात रासायनिक फवारणी करण्यात आली. यात उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला, तेर, किणी, वरवंटी, वडगाव, उपळा, पाडोळी, पोहनेर या गावांचा समावेश आहे. दरम्यान भूम परिसरात काही ठिकाणी ढग दिसल्याने विमानाने त्या दिशेने मोर्चा वळविला. भूम तालुक्यातील जेजला, तिंत्रज ढालेगाव येथे फवारणी झाल्यानंतर परंडा तालुक्यातील कंडारी, सोनारी आणि कार्ला या भागात रासायनिक फवारणी करून या विमानाने कळंब तालुक्यातील नरसिंगवाडी शिवारात फवारणी केली. याबरोबरच तुळजापूर तालुक्यातील अपसिंगा येथेही कृत्रिम पावसासाठी ढगांवर फवारणी करण्यात आली. मात्र अपेक्षित दाट ढग नसल्याने या प्रयोगाला फारसे यश मिळाले नाही. रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यात कोठेही मोठा पाऊस झालेला नव्हता. (प्रतिनिधी)
लातूर येथे आलेल्या विमानाने मुरूड परिसरातून फवारणी करीत उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर, भूम, परंडा तालुक्यातील काही गावात बुधवारी कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी रासायनिक फवारणी केली. कळंब तालुक्यातील नरसिंगवाडी शिवारातही प्रयत्न करण्यात आले. मात्र दाट ढगांअभावी यश मिळाले नसल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले. फवारणीवेळी विमानामध्ये महसील मंत्री एकनाथ खडसे स्वत: उपस्थित होते. फवारणी झाल्यानंतर विमान औरंगाबादला रवाना झाले. तेथे खडसे यांच्याशी चर्चा केली असता, बीड, लातूरसह इतर जिल्ह्याच्या तुलनेत उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याचे सांगत, कृत्रिम पावसासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक प्रयत्न करणार असल्याचे खडसे यांनी सांगितल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान पुढील दोन महिने कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरूच ठेवणार असून, उस्मानाबाद विमानतळावरच विमान थांबविता येईल का? ही बाबही विचाराधीन असल्याचे खडसे यांनी सांगितल्याचे आ. पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान दाट ढग आढळल्यास गुरुवारीही फवारणी करण्यात येणार आहे.
पृथ्वीवरील पाण्याची सूर्याच्या उष्णतेने वाफ होते. ही वाफ हलकी असल्याने वातावरणात उंच जाते. त्याचे ढगामध्ये रुपांतर होते. या ढगांना थंड हवा लागली की, वाफेचे रुपांतर पावसात होते. ही पावसाची प्रक्रिया नैसर्गिक आहे. कृत्रिम पावसाचा सगळा भर क्लाऊड सिडिंगवर असतो. क्लाऊड सिडींग म्हणजे ढगांची निर्मिती. जमिनीपासून साधारणत: २ हजार ते १८ हजार उंची फूट पाऊस पडण्याची क्षमता असलेले ढग असतात. उष्ण किंवा शीत या दोन पद्धतीने क्लाऊड सिडींग केले जाते. उष्ण पद्धतीमध्ये विमान किंवा रॉकेटच्या सहाय्याने ढगावर सोडियम क्लोराईडचा फवारा सोडला जातो. शीत पद्धतीत सिल्व्हर आयोडाईड आणि ड्राय आईस या रसायनाचा फवारा ढगावर केला जातो. इस्त्राईल, चीन, कॅनडा, रशिया, आफ्रिका, आणि युरोपियन देशांमध्ये असे प्रयोग केले जातात. चीन येथे आॅलम्पिकपूर्वी आणि रशियात देखील असा प्रयोग झाला होता. अमेरिका, कॅनडासारख्या ठिकाणी गारांचा आकार मोठा असतो. तिथेही सोडियम आयोडाईडचे कण फवारले की गारांची संख्या वाढते. ढगांची निर्मिती बाष्पापासून झालेली असते. आकाशातील ढगांचे तापमान शुन्य अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असते. पाऊस पडण्यासाठी ढगातील बाष्पातील रुपांतर हिमकणांमध्ये व्हावे, लागते. कृत्रिम पावसाच्या प्रयोगात हीच क्रिया रसायनांच्या साह्याने घडवून आणली जाते. मिठ फवारल्याने ढगांमधील बाष्पाचे रुपांतर हिमकणांमध्ये होऊ लागते.
महाराष्ट्रातील बारामती आणि शेगाव या दोन गावांच्या सुमारे २०० किलोमीटर परिघात पहिल्यांदाच कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. या प्रयोगानंतर १ ते ६ मिमी पाऊस पडल्याचे आढळले परंतु याच प्रयोगाच्या परिणामामुळे पाऊस पडल्याचे सिद्ध झाले नाही. त्यावेळी १२ कोटी रुपये खर्च झाले. २०१२ मध्ये हा खर्च ४० कोटीपर्यंत गेल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आता यापेक्षा दुप्पट खर्च अपेक्षित आहे.

Web Title: The first attempt is to fail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.