आधी गळा आवळून केले बेशुद्ध, नंतर कटरने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 23:50 IST2019-04-20T23:48:37+5:302019-04-20T23:50:01+5:30
शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर याच कटरने अजयने ३० मार्च रोजी रात्री सव्वादहा वाजता विश्वासचा गळा चिरला.

आधी गळा आवळून केले बेशुद्ध, नंतर कटरने वार
औरंगाबाद : शिक्षण संस्थाचालक विश्वास सुरडकर यांची हत्या केल्याची कबुली अजय ऊर्फ अज्जू तडवी याने दिली आहे. हत्येचा प्लॅन २८ मार्च रोजी ठरल्यानंतर २९ मार्चला नॅशनल कॉलनी भागातील एका दुकानातून २५ रुपयांचे कटर खरेदी केले होते. दोरीने गळा आवळून बेशुद्ध केल्यानंतर याच कटरने अजयने ३० मार्च रोजी रात्री सव्वादहा वाजता विश्वासचा गळा चिरला. आपल्या दुकानातून अजयनेच हे कटर नेल्याचा जबाब दुकानदाराने दिला आहे.
विश्वास सुरडकर यांची गळा आवळून आणि चिरून हत्या केल्याची घटना ३१ मार्च रोजी सकाळी हिमायतबाग परिसरात उघडकीस आली होती. पोलिसांनी १४ दिवस कसून तपास केल्यानंतर या प्रकरणात अजय ऊर्फ अज्जू बिस्मिला तडवी याला अटक केली. अजयने सांगितल्यानंतर उपनिरीक्षक संजय बहुरे यांनी फाजलपुरा भागातील नाल्यातून हत्येसाठी वापरलेले कटर जप्त केले आहे, तर त्याच्या घरातून रक्ताने माखलेले बुट, अंगातील शर्ट, रक्ताने भरलेली पॅन्टही जप्त करण्यात आली.
दुकानदाराने कटर ओळखले
आरोपी अजयच्या म्हणण्यानुसार विश्वासने स्वत:च त्याचा खून करण्याची सुपारी अजयला दिली होती. त्या दोघांनी हत्या करण्याचा डाव २८ मार्च रोजी रचला होता. त्यानंतर अजयने २९ मार्च रोजी नॅशनल कॉलनी भागातील सय्यद काझीम बिलग्रामी यांच्या दुकानातून २५ रुपयांत कटर खरेदी केले. रेडिअम कट करण्यासाठी कटर हवे, असे अजयने काझीम यांना सांगितले होते. दुकानातून विक्री झालेले आणि नाल्यातून जप्त केलेले कटर एकच असल्याचा जबाब काझीम यांनी पोलिसांना दिला. दरम्यान अजयच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली असून, ती २२ एप्रिलपर्यंत राहणार आहे.